हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रो सध्या अंतराळात मानव पाठवण्याच्या मोहिमेवर काम करत आहे. गगन यानच्या मदतीने अंतराळात मानवाला पाठवले जाणार आहे. सध्या या मोहिमेतील विविध तंत्रज्ञानांच्या चाचण्या होत आहेत. त्यामध्ये इस्रोला नुकतेच एक मोठे यश मिळाले. इस्रोने सीई20 क्रायोजेनिक इंजिनची एक महत्त्वपूर्ण चाचणी यशस्वी केली. त्यामुळे अंतराळात मानव पाठवण्याच्या मोहिमेच्या जवळ इस्रो पोहोचली आहे.
तामीळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये 29 नोव्हेंबर रोजी सीई20 क्रायोजेनिक इंजिनची टेस्ट यशस्वीपणे पार पडली, असे इस्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे. देशातच बनवलेले सीई20 क्रायोजेनिक इंजिन लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरने विकसित केले आहे. हे इंजिन प्रक्षेपण यानाच्या वरच्या टप्प्याला शक्ती पुरवते. क्रायोजेनिक इंजिन 19 टनांपासून 22 टनांपर्यंत थ्रस्ट लेवल्समध्ये काम करण्यासाठी डिझाइन केले आहे. इस्रोच्या मते, ही चाचणी भविष्यातील अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अनेक उपग्रह प्रक्षेपणासारख्या परिस्थितीत रॉकेट इंजिनांना पुन्हा चालू करण्याच्या तंत्रज्ञानाच्या विकासाला या चाचणीमुळे मोठा फायदा होईल. अवकाशात इंजिनांना पुन्हा चालू करणे, इस्रोच्या मोहिमांचा विस्तार करण्यास मदत करेल. आधीच इस्रोच्या चांद्रयान मोहिमांसाठी हे इंजिन वापरणारे एलव्हीएम3 रॉकेट वापरले गेले आहेत. पुढील मानवयुक्त गगन यान मोहिमेसाठीही हेच इंजिन वापरले जाईल.