Health news – आयव्हीएफदरम्यान अनुवांशिक आजारांचा धोका कमी करण्यासाठी प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) ठरणार प्रभावी

 

 

प्रजननाशी संबंधित तंत्रज्ञानातील प्रगतीसह, प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) तंत्रज्ञान इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगतीशील तंत्रज्ञान म्हणून उदयास आले आहे. PGT मुळे आयव्हीएफ प्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना गर्भधारणेपूर्वी भ्रूणांचे अनुवांशिक आरोग्य तपासण्याची संधी मिळते. त्यामुळे अनुवांशिक आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो आणि गर्भधारणेच्या यशस्वीतेची शक्यता वाढते.

PGT मध्ये आयव्हीएफद्वारे तयार झालेल्या भ्रूणांचे विशिष्ट अनुवांशिक स्थितीसाठी विश्लेषण केले जाते. या प्रक्रियेमुळे भ्रूणांमध्ये गुणसूत्रांची असामान्य संख्या असलेल्या अॅन्युप्लॉइडीसारख्या गुणसूत्रीय असमानता ओळखता येतात. संशोधनानुसार, 35 वर्षांवरील महिलांमध्ये जवळपास 30-50 टक्के भ्रूण अॅन्युप्लॉइड असू शकतात. यामुळे गर्भपात आणि गर्भारोपणाच्या अपयशाची शक्यता वाढते. PGT द्वारे, आरोग्यदायी भ्रूणांची निवड करून त्यांचे स्थानांतरण करता येते. यामुळे यशस्वी IVF प्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

PGT च्या विविध प्रकारांमध्ये PGT-A (अॅन्युप्लॉइडीसाठी), PGT-M (मोनोजेनिक विकारांसाठी), आणि PGT-SR (रचनात्मक फेरबदलांसाठी) यांचा समावेश होतो. PGT-M हे विशिष्ट अनुवांशिक विकारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या जोडप्यांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे अशा स्थितींचा पुढच्या पिढीत प्रसार टाळता येतो. उदाहरणार्थ, सिस्टिक फायब्रोसिस किंवा सिकल सेल डिसीजसारखे विकार याद्वारे ओळखता येतात.

PGT चे फायदे केवळ अनुवांशिक विकारांचा धोका कमी करण्यापुरते मर्यादित नाहीत. अभ्यास सूचित करतो की PGT गर्भारोपणाचे प्रमाण वाढवते आणि विशेषतः वाढत्या वयात आई होणाऱ्या महिलांमध्ये गर्भपाताची शक्यता कमी करते. अनुवांशिकदृष्ट्या सामान्य भ्रूणांची निवड करून, जोडप्यांना गर्भधारणेची अधिकाधिक शक्यता वाढते. यामुळे आयव्हीएफ प्रक्रिया अधिक प्रभावी व भावनिकदृष्ट्या समाधानकारक ठरते.

याशिवाय, PGT जोडप्यांना त्यांच्या प्रजनन आरोग्यासंदर्भातील सूचित निर्णय घेण्यास सक्षम बनवते. विशिष्ट परिस्थितींशी संबंधित अनुवांशिक धोके समजून घेतल्यामुळे कुटुंब नियोजन चांगल्या प्रकारे करता येते आणि मुलांमध्ये संभाव्य अनुवांशिक विकारांबाबतची चिंता दूर होऊ शकते. तरीसुद्धा, PGT चे परिणाम समजून घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी जोडप्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तसेच खर्च, भावनिक परिणाम, आणि नैतिक बाबी यांसारख्या घटकांचा विचार करणेदेखील आवश्यक आहे. PGT साठी आयव्हीएफ प्रक्रियेवेळी अतिरिक्त आर्थिक खर्च होऊ शकतो. पण हे अनेक जोडप्यांना आपल्या भावी मुलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

शेवटी, प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग हे आयव्हीएफमधील एक महत्त्वाचे पाऊल असून हे अनुवांशिक विकारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते. भ्रूणाच्या आरोग्यासंदर्भातील मौल्यवान माहिती प्रदान करून, PGT यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवते आणि जोडप्यांना त्यांच्या प्रजनन पर्यायांबाबत सशक्त बनवते. तंत्रज्ञानाच्या सततच्या प्रगतीमुळे, PGT भविष्यात मातृत्वाकडे जाणाऱ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग ठरेल, असे ठाम मत आयव्हीएफ तज्ज्ञ (बिर्ला फर्टिलिटी आणि आयव्हीएफ) डॉ. नविना सिंग यांनी व्यक्त केले.