कुत्र्याला किंमत आहे, पण आम्हाला किंमत नाही; वयोमर्यादेच्या प्रश्नावरून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर संताप

फाईल फोटो

सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे वेळेवर पदभरतीची जाहिरात काढली जात नाही. कोरोनामुळे आधीच एक वर्ष वाया गेले आहे. त्यातच पुन्हा आता गट ‘ब’ आणि गट ‘क’ची जाहिरात नऊ ते दहा महिने उशिरा काढली. त्यामुळे वयोमर्यादा संपुष्टात आलेले 70 ते 80 हजार विद्यार्थी बाहेर पडले आहेत. सरकारी दरबारी न्याय मागायला गेलो तरी कोणी आम्हाला विचारतही नाही. आम्ही नेमका न्याय मागायचा कोणाकडे. कुत्र्यांना किंमत आहे, पण आम्हाला किंमत नाही, अशी परिस्थिती सरकारने आमच्यावर आणून ठेवली आहे, अशा शब्दात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींनी पत्रकार परिषदेत आपला रोष व्यक्त केला. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास पुन्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी प्रवीण पाटील, रोहित देडे, विशाल रोधे, विशाल सरगर, गणेश चव्हाण यावेळी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी गोरगरीब कुटुंबातील आहेत. आर्थिक परिस्थितीला तोंड देत हे विद्यार्थी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शहराच्या ठिकाणी रात्रंदिवस अभ्यास करीत आहेत. मात्र, वेळेवर पदभरतीची जाहिरात काढली जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडून जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट ‘ब’ आणि गट ‘क’ ची जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये येणे अपेक्षित होते. मात्र, ही जाहिरात नऊ ते दहा महिने उशिरा आली. त्यामुळे जे विद्यार्थी वयोमानानुसार या परीक्षेला पात्र होणार होते, ते 70 ते 80 हजार विद्यार्थी जाहिरात उशिरा आल्यामुळे अपात्र ठरत आहेत. तसेच या जाहिरातीत वय मोजण्याचा कालावधी 1 फेब्रुवारी 2025 असा उल्लेखित केला आहे. त्यामुळे 2024 मध्ये पात्र ठरणारे विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. एकीकडे कोरोनामुळे एक वर्ष वाया गेले असताना दुसरीकडे जाहिरात उशिरा काढल्याने पुन्हा विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे.

वयोमर्यादेच्या काठावर असलेले विद्यार्थी फेब्रुवारी २०२४च्या जाहिरातीच्या आशेवर अभ्यास करत होते. मात्र, जाहिरात उशिरा आल्याने या विद्यार्थ्यांवर परीक्षेतून बाहेर पडण्याची पडण्याची वेळ आल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

सागर बंगल्याबाहेर दोन दिवस थांबलो

स्पर्धा परीक्षेचे शंभर ते दीडशे विद्यार्थी 8 आणि 9 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईतील सागर बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून होतो; परंतु त्याठिकाणी आम्हाला साधे कोणी विचारलेही नाही. आतापर्यंत अनेक आमदारांना आमच्या मागण्यांची निवेदने देऊन झाली, परंतु त्याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही. मग आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कोणाकडे, आम्हाला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल प्रवीण पाटील यांनी केला.