
टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे काहीच कारण नाही, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. या मिरवणुकीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर तो हाताळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असे न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलिसांना सांगितले. महाराष्ट्रात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास बंदी आहे का, असा सवालही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने केला. टिपू सुलतानची जयंती तुम्ही तुमच्या जागेवरच साजरी करा, असे पोलीस सांगू शकत नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले.