महाराष्ट्रातील अस्थिरतेला केंद्रातील नेते जबाबदार, राज्यातील नेते त्यांच्यापुढे नतमस्तक; वर्षा गायकवाड यांची खरपूस शब्दात टीका

महायुती मोठे बहुमत मिळवून सत्तेवर आली. मात्र मंत्रिपदावरून धुसफूस सुरूच असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारी सुरू आहेत. गृहखाते कुणाकडे असणार हे देखील स्पष्ट नाही. एकीकडे मंत्रि‍पदांवरून साठमारी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारसह केंद्राचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

दिल्लीत संसद परिसरात माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, इतके मोठे बहुमत मिळाले. निकाल 23 तारखेला लागला, पण सरकार बनवायला 5 तारीख उजाडावी लागली. देशाच्या संविधानाच्या माध्यमातून महामहीन राज्यपालांचा अधिकार अध्यक्षांनी वापरला आणि संविधान विरोधी सरकार निर्माण झाले. मोठा इव्हेंट केला. सेलिब्रिटींना बोलावले गेले. त्यात कोट्यवधींचा खर्च झाला. पण फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुर्ल्यात मोठी घटना घडली. त्यात सात लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. परभणी येथे आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या पुस्तकाची विटंबणा झाली. जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये अनेक लोक जखमी झाले. सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारच पूर्ण नाही, कारण खातेवाटप झालेले नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

राज्यात खून, दंगली होतायत आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसून नाकाने कांदे सोलतायत, संजय राऊत यांनी फटकारले

सरकार बनवायला, तिघांना शपथ घ्यायला 11 दिवस लागले, आता मंत्रिमंडळ विस्ताराला किती दिवस लागतात बघुया. पण महाराष्ट्रात अस्तिरतेचे वातावरण निर्माण व्हायला केंद्रातील नेते जबाबदार आहे आणि महाराष्ट्रातील नेतेमंडळी केंद्रापुढे नतमस्तक आहेत, असा टोला वर्षा गायकवाड यांनी मारला.