अजित पवारांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली, दोघांमध्ये काय चर्चा झाली? स्वत:च सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांचे पुतणे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. या भेटीचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच असून याबाबत अजित पवार यांनीच माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस असून उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त दोघांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो. दर्शन घेतले, चहापाणी झाले. तसेच इकडे काय चालले, तिकडे काय चालले… अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. परभणीमध्ये काल घडलेला प्रकार असो किंवा इतर ठिकाणी काय चालले यावरही चर्चा झाली.

दोघांमध्ये सर्वसाधारण चर्चा झाली. संसदेमध्ये लोकसभेचे कामकाज कमी का चालले, राज्यसभेचे कामकाज कमी का चालले. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे? अधिवेशन कधी आहे… अशी चर्चा झाली आणि चहपाणी झाल्यावर आम्ही निघालो, असे अजित पवार यांनी सांगितले.

राजकीय चर्चा झाली का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, राजकीय विषय कसले? सर्वसाधारण चर्चा होत असते. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी तिघांनीच शपथ घेतली. बाकी 40 लोकांचा शपथविधी कधी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनामध्ये बिल मांडली जातील. इतर कामाकाजावेळी उत्तरे देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री असण्याची गरज असते. या सगळ्याबाबत चर्चा झाली.

‘संकटकाळात सोडून गेलेले लोक…’, शरद पवार-अजित पवार भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे विचारले असता अजित पवार यांनी बहुतेक 14 डिसेंबरला खातेवाटप होईल अशी माहिती दिली. तसेच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेण्यास असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या भेटीतून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असे म्हटले. शरद पवार यांना मनापासून शुभेच्छा द्यायला आम्ही आलो. दरवर्षी शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद घेतो, असेही ते म्हणाले.