फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आता ऑर्डर रद्द केल्यावर भरावे लागणार पैसे

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. फ्लिपकार्टवरून घरबसल्या आवडीच्या वस्तू सहज खरेदी करू शकता आणि गरज नसल्यास कोणतीही ऑर्डर रद्द केली जाऊ शकते. मात्र, वारंवार ऑर्डर रद्द करणाऱ्यांपैकी तुम्ही एक असाल, तर आता सावध राहा. कारण फ्लिपकार्ट लवकरच ऑर्डर रद्द करणाऱ्यांसाठी रद्दीकरण शुल्क (कॅन्सलेशन  चार्जेस)  लागू करणार आहे.

नव्या अहवालानुसार, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आता ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकांकडून रद्दीकरण शुल्क लागू करण्याबाबत विचार करत आहेत. जे ऑर्डर कॅन्सल करतात आणि त्याची सुरुवात फ्लिपकार्टने केली आहे. टिप्सटर अभिषेक यादव याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये दावा केला आहे की, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा लवकरच ऑर्डर कॅन्सलेशन चार्ज लावणार आहेत. टिप्सस्टर कडून एक स्क्रिनशॉटही शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगण्यात आले की, हा कॅन्सलेशन चार्ज का घेण्यात येत आहे. यामध्ये लिहीले आहे की, विक्रेते आणि लॉजिस्टिक भागीदारांचा वेळ आणि मेहनत लक्षात घेऊन, प्लॅटफॉर्म त्यांना नुकसानभरपाई देऊ इच्छितो किंवा ऑर्डर रद्द झाल्यास काही पैसे देऊ इच्छितो. नव्या धोरणामुळे आता 20 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा दावा केला जात आहे.

फ्लिपकार्टने मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे समोर आलेला स्क्रिनशॉट पाहून अंदाज बांधला जावू शकतो. ही कॅन्सल फी वेगवेगळ्या ऑर्डरवर वेगवेगळी असू शकते आणि प्रिमियम प्रोडक्ट्ससाठी वेगळी असू शकते. असे मानले जाते की रद्दीकरण शुल्क भिन्न ऑर्डर मूल्यांसाठी आणि प्रीमियम उत्पादनांसाठी भिन्न असू शकते, वापरकर्त्यांना उच्च रद्द शुल्क भरावे लागू शकते.

विशेष करुन ग्राहकांनी विहित मुदतीत ऑर्डर रद्द केली तर त्यांना कोणतेही रद्दीकरण शुल्क भरावे लागणार नाही. पण ऑर्डरची प्रोसेस झाली असेल किंवा ते ट्रान्झिट, शिपींग स्टेजवर असेल तर रद्दीकरण शुल्क लागू केले जाईल. कंपनी लवकरच यासंबंधीचे अपडेट शेअर करू शकते आणि फ्लिपकार्ट नंतर मिंत्रा आपल्या ग्राहकांसाठी असे बदल करू शकते.