थकीत कर्जापोटी बँकेकडून केली जाणारी जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी 1 लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील इंडियन बँकेचा कायदा सल्लागार अॅड. विजय तुकाराम पाटणकर (रा. इचलकरंजी) याला पुण्याच्या सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज पहाटे तीन वाजता अटक केली.
इंडियन बँकेच्या कोल्हापूर शाखेतून संबंधित तक्रारदाराने साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज थकबाकीत गेले होते. यामुळे इंडियन बँकेकडून त्यांना घर जप्तीच्या कारवाईसंदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, आपल्या घरी शुभकार्य असल्या कारणाने बँकेने घर जप्तीची कारवाई तात्पुरती पुढे ढकलावी, अशी विनंती तक्रारदाराने बँकेचे कायदा सल्लागार अॅड. पाटणकर यांच्याकडे केली होती. त्यावर जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी अॅड. पाटणकर याने तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती 1 लाख 80 हजार देण्याचे निश्चित झाले होते. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रीयकृत बँकेचे कायदा सल्लागार यांच्या विरोधात तक्रार आल्याने त्याची माहिती पुणे येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर इचलकरंजीमधील बीएसएनएल कार्यालय परिसरात असलेल्या अॅड. पाटणकर यांच्या कार्यालयात 1 लाख 70 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सीबीआयचे अधिकारी दीपककुमार व त्यांच्या पथकाने केली.
अॅड. पाटणकर यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी, तर संशयिताच्या वतीने अॅड. मेहबुब बाणदार यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने अॅड. पाटणकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.