वांगणीत भाजप महिला सरपंचाला अटक, घरपट्टी लावण्यासाठी मागितले 30 हजार

वांगणीतील लाचखोर महिला सरपंच वनिता आडाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात सापडल्या आहेत. घरपट्टी लावण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप असून आज त्यांना अटक केली आहे. यापूर्वीही आडाव यांच्याविरोधात ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. दरम्यान या घटनेमुळे हीच का तुमची ‘पार्टी विथ डिफरन्स’, असा संतप्त सवाल वांगणीतील रहिवाशांनी भाजपला केला आहे.

वांगणीतील एक गरीब महिला सरपंच वनिता आडाव यांच्याकडे घरपट्टी लावण्यासाठी गेली होती. त्यावेळी सरपंचांनी थेट 30 हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून आडाव यांना अटक करण्यात आली. तक्रारदार महिलेने पैशांची मागणी करीत असल्याची क्लिपदेखील अॅण्टी करप्शनला दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.