अदानी लाचखोरी मुद्दय़ावरून विरोधकांनी सत्ताधाऱयांना चांगलेच घेरले असून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. सभागृहाच्या बाहेरही आंदोलन करत अदानीचा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लावून धरला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी आज ‘देश को बिकने मत देना!’ असे फलक फडकावले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तिरंगा राष्ट्रध्वज आणि गुलाबाचे फूल देत संसदेचे कामकाज चालू देण्याची विनंती करून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी करत आंदोलन केले.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दिल्लीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरणावरून विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले आहेत. मात्र, अदानी प्रकरणाच्या चर्चेवरून पळ काढणाऱया सत्ताधाऱयांकडून सभागृहात जाणीवपूर्वक गोंधळ घालून लोकसभा व राज्यसभेचे कामकाज बंद पाडले जात आहे. अधिवेशन सुरू होऊन बारा दिवसांचा कालावधी उलटला तरी एक दिवसही कामकाज होऊ शकले नाही. संसदेच्या कामकाजातील हा तिढा सोडविण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुढाकार घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. संसदेचे कामकाज चालावे ही कॉँग्रेस तसेच सर्व विरोधी सदस्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. तसेच सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे सांगितले. या भेटीनंतर लगेच त्याचे पडसाद लोकसभेच्या कामकाजात उमटले आणि दिवसभर सुरळीतपणे कामकाज पार पडले.
मुखवटा, बॅग आणि आता झेंडा
संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी व अदानींचे मुखवटे घातलेल्या दोन खासदारांची मिश्किल शब्दांत जाहीर मुलाखत घेतली. दुसऱया दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांचे उल्लेख असलेल्या बॅग विरोधी पक्षाच्या खासदारांनी आवारात दाखवल्या. आता गुलाबाचे फूल आणि तिरंगा राष्ट्रध्वज मंत्री आणि सत्ताधारी खासदारांना देऊन विरोधी सदस्यांनी गांधीगिरी करत संसदेच्या परिसरात आंदोलन केले.
13 तारखेला संविधानावर चर्चा
आम्हाला कितीही उकसवण्याचा प्रयत्न झाला तरी सभागृहाचे कामकाज मात्र सुरू ठेवायचे असे आम्ही ठरवले आहे. काहीही करून सभागृह चालावे असाच आमचा प्रयत्न असेल. 13 तारखेला संविधानावर चर्चा आहे आणि ही चर्चा व्हायला हवी. त्यामुळे सभागृहाचे कामकाज आम्ही सुरूच ठेवू, असे राहुल गांधी म्हणाले.
राज्यसभेत सत्ताधाऱयांकडून गदारोळ, कामकाज तहकूब
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत विरोधी सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरेस आणि सोनिया गांधी यांचे नाते काय, असा मुद्दा उपस्थित करत राज्यसभेत जाणीवपूर्वक गदारोळ घडवून आणला. परिणामी दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी सोरेसच्या नावाने गोंधळ सुरू केला. विशेष म्हणजे, सभागृह नेते व केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनीच जॉर्ज सोरेस आणि कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे काय नाते आहे, असा सवाल केला. सोरेस आणि कॉँग्रेसमध्ये असणारे नाते देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असल्याचे नड्डा म्हणाले.
अदानीचा मुद्दा सोडणार नाही, राहुल गांधी यांनी ठणकावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार उद्योगपती गौतम अदानींना पाठीशी घालत आहे. भाजप अदानी मुद्दय़ावरून लक्ष विचलित करू इच्छित आहे. सोरोस यांच्यावरून ते आरोप करत आहेत, पण त्या आरोपांनी मला काहीही फरक पडत नाही. सभागृह चालवण्याची जबाबदारी आमची नाहीये, तरीही आम्ही म्हणत आहोत की सभागृहात कामकाज झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण, अदानीचा मुद्दा आम्ही सोडणार नाही. अदानीच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करणारच, असे राहुल गांधी यांनी ठणकावले.