परभणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हय़ात संतापाचा भडका उडाला आहे. घटनेच्या निषेधार्थ आज बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला हिंसक वळण लागले. आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी करत मोर्चा काढण्यात आला, रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांचा संयम सुटला. तुफान दगडफेक आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. अनेक वाहने पेटवून देण्यात आली. त्यामुळे शहरात प्रचंड तणाव पसरला असून आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठ्या चालवल्या. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. दरम्यान, परभणी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून एसटी सेवा ठप्प झाली आहे. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची मंगळवारी सायंकाळी एका माथेफिरूने विटंबना केली. विटंबनेचे वृत्त वाऱयासारखे जिल्हाभर पसरले. विटंबना करणाऱया माथेफिरूला अटक करण्याच्या मागणीसाठी दलित समाज रस्त्यावर उतरला. किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
एसटी सेवा पूर्णपणे बंद
संविधान विटंबनेवरून उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर परभणी आगाराने बससेवा बंद ठेवली होती. त्यामुळे मंगळवार सायंकाळपासून आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. बुधवारी दिवसभर बससेवा बंदच होती. त्यामुळे बसेसचे नुकसान टळले, पण प्रवाशांचे हाल झाले. जमावाने केलेल्या दगडफेकीत सात बसचे नुकसान झाल्याचे आगारप्रमुख बाबा कळम यांनी सांगितले. पुढील आदेशापर्यंत आगारातून बस सोडण्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.
हिंसाचार प्रकरणी 40 जण ताब्यात
हिंसाचार प्रकरणी 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर आणि जिह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसआरपीच्या दोन तुकडय़ाही शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी शहरात दाखल होत स्थितीचा आढावा घेतला.
तणावाचे रूपांतर दंगलीत
बुधवारी सकाळपासूनच परभणी शहर धुमसत होते. शहरातील रस्त्या रस्त्यावरून तरुणांचे जथे फिरत होते. दगडफेक, वाहनांची मोडतोड यामुळे व्यापारी पेठा भयभीत झाल्या. मात्र तरुणांच्या जथ्यांना रोखण्यात पोलीस कमी पडले. पोलिसांनीच शेपूट घातल्याने शहर आयतेच दंगलखोरांच्या तावडीत सापडले. संविधानाची विटंबना करणाऱया माथेफिरूला फाशी झाली पाहिजे, अशा घोषणा संतप्त जमावाने दिल्या. शहरातील वसमत रोड, खानापूर फाटा, सुभाष रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, स्टेशन रोड, बस स्टँड, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी संतप्त आंदोलकांनी ठिकठिकाणी टायर जाळले, जागोजागी लावलेले बॅरिकेड्स उखडून फेकले. दुकानांसमोरील बोर्ड, टेबल, शोची झाडे यांची नासधूस केली. बस स्थानकासमोरील फळांचे गाडे डिग्गी नाल्यात फेकून दिले. तसेच छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशन रोड आदी भागांत वाहनांची तोडफोड झाली. आग विझविण्याकरिता आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबावरसुद्धा तुफान दगडफेक करण्यात आली.
दलित वस्तीवरील कोम्बिंग ऑपरेशन थांबवा – प्रकाश आंबेडकर
मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी पह्नवर बोललो आहे. या प्रकरणात विनाकारण दलित समाजाच्या लोकांना अटक करणे आणि दलितांच्या वस्तीवरील कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणी मी केली आहे. शांततेत आंदोलन करा. तोडपह्ड करणाऱयांना उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अटक झाली नाही तर मी उद्या कृती आराखडा सांगेन, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. जातीयवादी समाजपंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील भारतीय राज्यघटनेची केलेली तोडफोड ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी केलेल्या विरोध प्रदर्शनामुळे पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करून एका समाजकंटकाला अटक केली. मी सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महिला घुसल्या
बंदोबस्तावरील पोलिसांच्या गाडय़ांवर दगडांचा वर्षाव करण्यात आला. जमावाचा रोष पाहून पोलिसांच्या गाडय़ांनी पळ काढला. जाळपोळ, दगडफेकीची झळ थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला बसली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कक्षासह कार्यालयातसुद्धा काही आंदोलक घुसले. संतप्त महिला आंदोलक चर्चा करण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कक्षात गेल्या. त्यांनी जिल्हाधिकाऱयांच्या टेबलावरील कागदपत्रे उधळून दिली. कक्षाची काचही फोडण्यात आली.
हिंसक घटनांनंतर तत्काळ जमावबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. झेरॉक्स सेंटर, ध्वनिक्षेपकही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू असणार आहे.
दोषीवर कठोर कारवाई करा
परभणीत समाजकंटकाने संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना अतिशय संतापजनक व निषेधार्ह आहे. या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. संविधानाला श्रेष्ठ मानणाऱया सर्वांनीच कायदा-सुव्यवस्था पाळून आंदोलन शांततेने करावे, असे आवाहन त्यांनी केले.