सामना अग्रलेख – महाराष्ट्रात हे काय चाललेय?

धमक्या व अरेरावी ही महाराष्ट्राची संस्कृती झाली आहे. ‘‘आमचे कोण काय करणार? बघून घेऊ!’’ ही भाषा राज्यकर्त्यांच्या तोंडी सर्रास दिसत आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला लागलेले हे ग्रहण आहे. पोलिसांनी आपली पत गमावली. पैसे मोजून पदांवर यायचे व त्या वसुलीसाठी गुंडांचे राज्य पोसायचे, हेच महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्राने गेल्या 55 वर्षांत जे कमावले ते गेल्या अडीच वर्षांत उद्ध्वस्त झाले. राज्यात जे सुरू आहे ते सहन करता येणार नाही, पण पाशवी बहुमत महाराष्ट्राला सैतानाच्या गुहेत ढकलत आहे. राज्यात लोकांना रस्त्यावर चालायला भीती वाटते आहे. कारण कोठून बंदुकीची गोळी येईल व मारले जाऊ याचा नेम राहिलेला नाही!

महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल लागून पंधरवडा उलटला.  मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथा घेतल्या, पण मंत्रिमंडळ काही अद्याप तयार होऊ शकलेले नाही. गृहखात्याचा घोळ सुरूच आहे. त्या घोळात महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेचे रोज बारा वाजत आहेत. खून, अपहरण, दरोडे या गुन्ह्यांनी ऊत आणला आहे. बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण गंभीर आहे. देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण मराठवाड्यात खळबळ माजली व लोक रस्त्यावर उतरले. त्याच वेळी मराठवाड्यातच परभणी येथे मंगळवारी संविधानाच्या विटंबनेचा प्रकार घडला. त्यातून वातावरण तणावपूर्ण झाले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागले. पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करण्याची वेळ आली. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथे असलेल्या संविधानाच्या प्रतीची अज्ञात माथेफिरूने विटंबना केल्याने तेथील वातावरण दोन दिवस तणावपूर्ण आहे. तिकडे पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी पहाटे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केले व त्यांची हत्या झाली. पुण्यात कोयता गँगने आधीच हैदोस घातला आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर गोळीबार होतो. कोयता गँग हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर दहशत निर्माण करते आणि पोलीस हा हॉरर शो उघड्या डोळ्यांनी पाहत बसतात. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण होताच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांना फोन केला, तेव्हा ते खासदारांचा फोन दोन दिवस उचलायला तयार नव्हते. पोलीस प्रशासन एकतर

निर्ढावलेले

आहे किंवा दबावाखाली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कायदा, पोलीस प्रशासनाचे निघत असलेले धिंडवडे चिंताजनक आहेत. मुंबईत बेस्ट बसखाली सात जणांचा चिरडून मृत्यू होतो. पुण्यात श्रीमंतांची पोरे दारूच्या नशेत महागड्या गाड्या उडवतात व गाडीखाली निरपराध लोकांना चिरडतात आणि गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस ठाण्यात जाऊन हंगामा करतात. मारकडवाडीतील जनतेने बॅलेट पेपरवरील मतदानाचा स्वतःचा मार्ग निवडला तेव्हा सरकारने 144 कलम लावून गावात दडपशाही सुरू केली, शंभरावर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार मारकडवाडीत जाऊन लोकांना धमक्या देण्याची भाषा करू लागले. फडणवीस यांना राज्य हे अशा पद्धतीने चालवायचे आहे काय? ‘‘आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही,’’ अशी भाषा सत्ताधारी पक्षाचे लोक उघडपणे करतात. मग गुंडांना मोकळे रान मिळाले व दिवसाढवळ्या खुनाखुनी झाली तर जबाबदार कोण? महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, पण खऱ्या अर्थाने अजून सरकार निर्माण झालेले नाही. सत्तापक्षांमधील प्रत्येकाला गृहखात्याची आस लागली आहे, ती आपापल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी. जनतेचे संरक्षण गेले चुलीत. नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरांत गुंडांचे राज्य सुरू आहे व पोलीस हतबलतेने हे गुंडाराज सहन करीत आहेत. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. माजी मंत्रीच भररस्त्यावर मारले गेले. हे चित्र भयंकर आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार केला. दादरच्या माजी आमदाराने गणपती मिरवणुकीत गोळीबार केला. आमदार प्रकाश सुर्वेंच्या चिरंजीवाने एका व्यापाऱ्याचे

अपहरण

केले. आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. सत्ताधारी पक्षात कायदा मोडण्याची व गुंडगिरी करण्याची स्पर्धा लागली आहे. अशा वेळी तणावाखाली असलेले पोलीस बापडे तरी काय करणार? हा मजकूर लिहीत असताना जालन्यात एका ट्रकचालकावर अंदाधुंद गोळीबार झाल्याचे वृत्त आले. गावोगाव असे हिंसक प्रकार सुरू आहेत. बंदुका, सुरे, तलवारी, कोयते यांचे राज्य महाराष्ट्रात सुरू आहे. याच गुंडशाहीने राज्यात निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली. परळीसारख्या ठिकाणी मतदारांना केंद्रावर फिरकू दिले नाही व मतदान हवे तसे करून घेतले. महाराष्ट्र राज्याचे हे अधःपतन आहे. राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांचे लोक ठेकेदारांकडून अफाट दलाली उकळतात व त्या पैशांतून गावागावांत राजकीय झुंडशाही करतात. महाराष्ट्रात सुरू असलेला पैशांचा हा खेळ चिंताजनक आहे. प्रत्येक जण मिळेल त्या मार्गाने महाराष्ट्राला ओरबाडतो आहे. हे ओरबाडणे महाराष्ट्राच्या मुळावर आले तरी त्याची फिकीर राज्यकर्त्यांना नाही. धमक्या व अरेरावी ही महाराष्ट्राची संस्कृती झाली आहे. ‘‘आमचे कोण काय करणार? बघून घेऊ!’’ ही भाषा राज्यकर्त्यांच्या तोंडी सर्रास दिसत आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला लागलेले हे ग्रहण आहे. पोलिसांनी आपली पत गमावली. पैसे मोजून पदांवर यायचे व त्या वसुलीसाठी गुंडांचे राज्य पोसायचे, हेच महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्राने गेल्या 55 वर्षांत जे कमावले ते गेल्या अडीच वर्षांत उद्ध्वस्त झाले. राज्यात जे सुरू आहे ते सहन करता येणार नाही, पण पाशवी बहुमत महाराष्ट्राला सैतानाच्या गुहेत ढकलत आहे. राज्यात लोकांना रस्त्यावर चालायला भीती वाटते आहे. कारण कोठून बंदुकीची गोळी येईल व मारले जाऊ याचा नेम राहिलेला नाही!