![prahlad-iyengar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/prahlad-iyengar-696x447.jpg)
अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे माहेर घर असलेल्या अमेरिकेच्या केंब्रिजमध्ये एमआयटीने हिंदुस्थानी वंशाच्या एका विद्यार्थ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या विद्यार्थ्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निबंध लिहिल्याने त्याच्यावर ही कारवाई झाल्याने विद्यापिठावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रल्हाद अय्यंगर असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि कम्प्युटर सायन्स विभागातून पीएचडी करत आहे. आता त्याची 5 वर्षाची नॅशनल सायन्स फाऊंडेशन ग्रॅज्युएट रिसर्च फेलोशिप संपणार आहे. एमआयटीने प्रल्हादला कॉलेज कॅम्पसमध्ये येण्यासही बंदी घातली आहे. त्याने हा निबंध महाविद्यालयाच्या मॅगझिनमध्ये लिहीला होता. जो एमआयटीने हिंसेशी संबंधित मानला आणि त्या मासिकावरही बंदी घालण्यात आली आहे.
प्रल्हाद याने ऑन पॅसिफिजम या विषयावर निबंध लिहीला होता. त्याच्या लेखात हिंसक प्रतिकाराची थेट भूमिका नसली तरी, पॅलेस्टाईनसाठी ‘शांततावादी रणनीती’ हा चांगला उपाय असू शकत नाही, असे त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे या निबंधात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दहशतवादी संघटना मानलेल्या पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनचा लोगोही दाखवण्यात आला होता. प्रल्हादच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर दहशतवादाचे आरोप केले जात आहेत. हे चुकीचे आहे. निबंधात दिलेल्या छायाचित्रांमुळेच हे लादले जात आहेत. त्याने ही चित्रे दिली नाहीत.
दुसरीकडे महाविद्यालयाचे म्हणणे आहे की, निबंधात ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी हाक मानली जाऊ शकते. अय्यंगार याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, प्रल्हादला निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांनंतर त्याला गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते. एमआयटीच्या वर्णद्वेष विरोधी आघाडीनेही आवाज उठवला आहे. संघटनेशी संबंधित विद्यार्थ्यांनी एमआयटीच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.