ऑन द स्पॉट 301 घरांची विक्री, म्हाडाच्या विशेष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील पंतप्रधान आवास योजनेतील 14,047 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेला सर्वसामान्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत असून 301 जणांनी ऑन द स्पॉट घर खरेदीसाठी पैसे जमा केले आहेत.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱयास ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या घरांच्या विक्रीत वाढ व्हावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 2 डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे, कल्याण, वसई- विरार परिसरात सरकारी कार्यालये तसेच रेल्वे स्टेशनबाहेर 29 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच पथनाटय़ आणि रिक्षांमधून जनजागृती केली जात आहे. 12 डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

म्हाडाच्या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंडळाने ठिकठिकाणी उभारलेल्या स्टॉल्सला आतापर्यंत सुमारे सहा हजार जणांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. त्यापैकी 301 जणांनी सदनिका खरेदीसाठी विक्री किंमतही जमा केली आहे.
– रेवती गायकर, मुख्य अधिकारी, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ