हिंदुस्थानचा युवा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश आणि जगज्जेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. उभय खेळाडूंमध्ये या घडीला 6-6 अशी झाली असून स्पर्धेतील दोनच डाव उरल्याने स्पर्धेतील अंतिम टप्प्यातील थरारावर तमाम बुद्धिबळविश्वाच्या नजरा खिळल्या आहेत. बुधवार व गुरुवारी उर्वरित दोन डाव रंगणार आहेत.
18 वर्षीय गुकेशने 32 वर्षीय लिरेनपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. आतापर्यंत झालेल्या 12 डावांत दोघांनीही 2-2 लढती जिंकल्या असून 8 लढती बरोबरीत सुटल्या आहेत. जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरण्यासाठी दोन्ही खेळाडूंना 1.5 गुणांची गरज आहे. त्यामुळे उर्वरित दोन डावांत गुकेश-लिरेन कुठल्या डावपेचासह खेळतात याची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. लागोपाठ लढती बरोबरीत सुटत असल्याने स्पर्धेतील रंगत कमी झाली होती. डी. गुकेशने 11 व्या डावात बाजी मारत स्पर्धेत आघाडी घेतली होती, मात्र लिरेनने 12वा डाव जिंकून पुन्हा लढतीत बरोबरी साधली. आता उद्या 13व्या लढतीत डी. गुकेश पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळण्याचा किती फायदा उठवितो यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल.