ठसा – गायनाचार्य शंकर कृष्ण अभ्यंकर

>> श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर

पंडित शंकर कृष्ण अभ्यंकर यांचे वडील कृष्णाजी गोविंद अभ्यंकर प्राथमिक शाळेत शिक्षक होते. वडिलांना गायनाची खूपच आवड मनोमन होती. वडिलांची इच्छा होती की, त्यांच्या सुपुत्रांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर,उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन करावे, पण तो अलभ्य योग नव्हता. साताऱ्याचे त्यांचे शास्त्रीय संगीताचे आद्य गुरू म.रा. दांडेकर आहेत.

ग्वाल्हेर घराण्याचे कृष्णराव पंडित, अंतूबुवा जोशी, पंडित गजानन जोशी यांच्याकडेसुद्धा मार्गदर्शनाचा योग नव्हता.  ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित नारायणराव व्यास यांच्याद्वारे चौदा वर्षे गुरुकुल गुरुमुखी विद्येद्वारे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यांच्याकडे विद्यार्थ्यांना गायनासह इतर वाद्येही शिकविली जायची. त्यामुळे शंकर अभ्यंकर यांचे तबला वादनावरसुद्धा प्रभुत्व मिळवले. अनेकदा पंडित. नारायणराव व्यास यांच्या संपूर्ण संगीत मैफलीत त्यांनी तबला संगतसुद्धा केलेली आहे. त्यांनी सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीतज्ञ पंडित शंकरराव व्यास यांच्याद्वारे सतार वादनावरसुद्धा प्रभुत्व मिळवले.

पंडित रविशंकर, उस्ताद विलायत खाँ यांच्या सतार वादनाचा एकनिष्ठेने अभ्यास आणि रियाझ केला. सवाई गंधर्व पुण्यतिथी,  गुणीदास संगीत संमेलन या नामांकित प्रतिष्ठत  संगीत महोत्सवात तसेच सिंगापूर, इंग्लंड, पोलंड या आणि अन्य परदेशांतही त्यांचे सतार वादनाचे कार्यक्रम झाले आहेत.

पंडित कुमार गंधर्व हे त्यांचे ‘मानसगुरू’ आहेत. त्यांच्या गायकीने, त्यांच्या बंदिशींनी ते मंत्रमुग्ध झाले. मानसगुरूंच्या प्रेरणेने त्यांनी बंदीश निर्मितीसुद्धा केलेली आहे. त्यांनी पारंपरिक रागांत, जोड रागात वेगवेगळ्या तालांमध्ये अनेक आकर्षक बंदिशी बांधल्या आहेत. हमीर नंद, हमीर केदार, नायकी मल्हार, मारू बसंत, प्रतीक्षा, आराधना ही रागनिर्मिती त्यांचीच आहे. विलंबित ख्याल, छोटे ख्याल, तराणे,  दादरा, ठुमरी, झुला, भजन या उपशास्त्रीय संगीतयुक्त रचनांचाही त्यात अंतर्भाव आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाने या बंदिशींचा ‘आराधना’ हा सन 1991 मध्ये प्रकाशित झालेला मार्गदर्शनपर संग्रह संगीत रसिकांत ख्यातकीर्त आहे.

पंडित शंकर अभ्यंकर यांनी गायन, सतार या दोन्हीत ‘संगीत अलंकार’ ही पदवी प्राप्त केली. त्यांनी श्रीम. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या संगीत विभागात ; संगीताचे प्राध्यापक रूपात अनेक वर्षे अध्यापन केले. त्यांनी संगीत शिक्षक संघ, मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष या नात्याने गेली चाळीसहून अधिक वर्षे संस्थेचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या पत्नी कमल मराठे, कमल शंकर अभ्यंकर या नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या. त्यांचे सुपुत्र रवी अभ्यंकर आणि मुकुल अभ्यंकर अन्य क्षेत्रांत कार्यरत होते. नातवंडांनासुद्धा संगीताची मनोमन आवड आहे. गायनाचार्य पंडित शंकर अभ्यंकर यांना अन्नपूर्णादेवी प्रतिष्ठान तर्फे   शिक्षकोत्तम पुरस्कार, ज्येष्ठ बासरी वादक आणि पंडित पन्नालाल घोष आणि पंडित देवेंद्र मुरडेश्वर यांचे शिष्योत्तम पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते गेल्या महिन्यात प्रदान करण्यात आला.  अन्नपूर्णादेवी या स्वतः सर्वोत्तम संगीत गुरू असल्याने अन्नपूर्णादेवी प्रतिष्ठानतर्फे  शिक्षकोत्तम पुरस्कार स्वीकारताना पंडित शंकर अभ्यंकर यांचे अंतःकरण भरून आले होते.

(ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ञ)