धनखड यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव का आणला? जयराम रमेश यांनी सांगितलं कारण

जगदीप धनखड यांना राज्यसभेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करत इंडिया आघाडीने राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी राज्यसभेच्या महासचिवांना घटनेच्या कलम 67 ब अंतर्गत यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला. आता याबाबतच काँग्रेस खासदार जयराम रमेश यांचे वक्तव्य आलं आहे. ते म्हणजे आहेत की, ही वैयक्तिक बाब नाही. विरोधी पक्षनेत्यांच्या अपमानाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे.

जयराम रमेश म्हणाले की, ”शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक या विरोधी पक्षांच्या खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.”

सरकारला सभागृहाचे कामकाज चालवायचे नाही, असंही जयराम रमेश म्हणाले आहेत. जयराम रमेश यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचं नाव घेत आरोप केले आहेत की, राज्यसभेचे कामकाज चालू न देण्याबाबत रिजिजू यांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी दावा केला की, ”फ्लोअर लीडर्सच्या बैठकीत रिजिजू म्हणाले होते की, तुम्ही (विरोधी पक्ष) लोकसभेत जोपर्यंत अदानीचा मुद्दा मांडत राहाल, तोपर्यंत आम्ही (सत्ताधारी पक्ष) राज्यसभेचे कामकाज चालू देणार नाही.”

यामुळे आणण्यात आला अविश्वास प्रस्ताव

जयराम रमेश यांनी जगदीप धनखड यांना राज्यसभेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणणे हा एक वेदनादायक निर्णय असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले की, ”अध्यक्ष राज्यसभेचे कामकाज अत्यंत पक्षपाती पद्धतीने चालवत आहेत. त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय इंडिया आघाडीकडे पक्षांकडे पर्याय नव्हता. संसदीय लोकशाहीच्या हितासाठी हे पाऊल उचलावे लागले.”