उत्तर प्रदेशातील नोएडा येथील अमरोहा येथून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचा सदस्य ताबीश असगर याने हिंदू मुलीला फसवून तिला आपली हिंदू ओळख सांगून विवाह केला. त्यानंतर त्या तरुणीवर दबाव टाकून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यस प्रवृत्त केले. या हिंदू मुलीला अडकवण्याच्या संपूर्ण प्रकरणात मुस्लिम मुलाच्या कुटुंबीयांचाही हात होता. याप्रकरणी पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुस्लिम युवकाला अटक केली.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण नोएडाच्या सेक्टर 113 पोलीस स्टेशनचे आहे. 3 डिसेंबर 2024 रोजी एका हिंदू मुलीने या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 4 वर्षांपूर्वी तिने फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाशी मैत्री केली होती. तेव्हा फेसबुक प्रोफाइलवर त्याचे नाव विशाल होते. यानंतर ती त्या मुलाला भेटायलाही गेली होती. यावेळी त्याने आपले नाव विशाल राणा असून राहायला अमरोहा मधील असल्याचे सांगितले होते. विशाल हा राजपूत घराण्यातील असल्याचेही त्याने पीडितेला सांगितले. यानंतर वर्षभरातच 20 डिसेंबर 2021 रोजी त्याचा साखरपुड़ा झाला. साखरपुड्याच्या कार्यक्रमात विशालचा भाऊही उपस्थित असून त्याने त्याचे नाव वासू राणा असल्याचे सांगितले, अशी माहिती पीडितेने दिली.
22 फेब्रुवारी 2023 रोजी, पीडिता आणि आरोपी विशाल राणा यांचे गाझियाबादमधील एका मॅरेज लॉनमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाले. या लग्नाला पीडितेचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते. लग्नानंतर विशाल आणि हिंदू तरुणी एकत्र राहू लागले, लग्नानंतर काही दिवसांनी विशाल राणाने तरुणीला कोर्ट मॅरेज करण्यासाठी अलाहबादच्या हायकोर्टात नेले. यावेळी विशालच्या नावाची आणि धर्माची माहिती समोर आली.
हिंदू तरुणीने येथील कागदपत्रे पाहिल्यानंतर तो विशाल नसून ताबीश असगर असल्याचे तिला समजले. या खुलाशानंतर तबीश असगरने पीडितेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. पीडितेने नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर अनेकदा त्याने पीडितेला धमकवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पुढील वर्षभर सुरुच होते. यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये पीडिता गर्भवती राहिल्यानंतर ताबीशने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. यानंतर पीडिता अस्वस्थ झाली आणि तिच्या माहेरच्या घरी राहू लागली. या प्रकरणी पीडिता आणि तिच्या घरच्यांनी ताबीश विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ताबीशविरुद्ध कलम 323, 313, 506 धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.