
उत्तर प्रदेशमध्ये सध्या महाकुंभ मेळ्याच्या तयारीला वेग आला या सोहळ्याला सुमारे 45 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. यंदा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात एकूण 44 दिवस महाकुंभ मेळा प्रयागराज येथे होणार आहे.
दर 12 वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होतो. कोट्यवधी भाविक या कुंभ मेळ्याला हजेरी लावत असतात. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या काळात सुरक्षा व्यवस्थेसाठीही चोख बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.
महाकुंभ मेळ्यात शाही स्नानाला मोठं महत्त्व असल्याचे मानलंेजातं. प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महा कुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा, 14 जानेवारी – मकर संक्रात, 29 जानेवारी – मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी – वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी – महाशिवरात्र यै शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
यंदाचा महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनेही तयारी केली असून स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पाच स्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांसह जवानही तैनात करण्यात येणार आहे. तसेच यात्रेकरू, साधू, संत आणि पर्यटकांच्या आरोग्य सेवेसाठी डॉक्टरांचे पथकही तैनात असणार आहे.
परेड मैदानावर 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. 20 खाटांची आणि 8 खाटांची दोन छोटी रुग्णालयेही तयार करण्यात आली आहेत. सेना रुग्णालयाने मेळा परिसर आणि अरेल येथे प्रत्येकी 10-10 खाटांचे दोन आयसीयू उभारले आहेत. या रुग्णालयांमध्ये 24 तास डॉक्टर तैनात असतील. 291 एमबीबीएस आणि तज्ज्ञ डॉक्टर, 90 आयुर्वेदिक आणि युनानी तज्ज्ञ आणि 182 परिचारिका कर्मचारी आहेत. पुरुष, महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी दिली.