Kurla bus accident – ना बसमध्ये तांत्रिक बिघाड, ना चालकाचं मद्यप्राशन; पोलिसांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण

मुंबईतील कुर्ला भागात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक देत 25-30 पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात 6 जणांना मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. बसमध्ये तांत्रित बिघाड झाला असावा किंवा चालकाने मद्यप्राशन केले असावे असा प्राथमिक अंदाज या अपघातानंतर वर्तवण्यात आला होता. मात्र आता पोलीस चौकशीमध्ये धक्कादायक कारण समोर आले आहे.

बस अपघाताप्रकरणी अटक करण्यात आलेला चालक संजय मोरे हा 10 दिवसांपूर्वीच कंत्राटी कामगार म्हणून कामावर रुजू झाला होता. 1 डिसेंबर रोजी तो कामावर रुजू झाला होता आणि त्याला इलेक्ट्रीक बस चालवण्याता कोणताही अनुभव नव्हता. सोमवारी त्याने पहिल्यांदा बस चालवली. यावेळी बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

काळजाचा थरकाप उडवणारी भयंकर दुर्घटना ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास मुंबईतील कुर्ला भागात घडली. बेस्टच्या भरधाव एसी बसने अनेक वाहनांना धडक देत किमान 25 जणांना चिरडले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. बेस्टची कुर्ला ते अंधेरी या मार्गावर धावणारी बस क्रमांक 332 अनेकांसाठी काळ ठरली. कुर्ला पश्चिम येथून अंधेरीकडे ही बस निघाली होती. एस. जी. बर्वे मार्गावर अंजुमन-ए-इस्लाम शाळेसमोर बस भरधाव असतानाच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि भयंकर दुर्घटना घडली. शाळेसमोर प्रथम या बसने रिक्षाला चिरडले. त्यानंतर समोर येणारी वाहने, पादचाऱ्यांना बस उडवत पुढे गेली आणि बाजारपेठेत हाहाकार माजला. किंकाळ्यांनी सारा परिसर हादरून गेला.

दरम्यान, या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. कन्नीस अन्सारी (वय – 55), आफरीन शाह (वय – 19), अनम शेख (वय – 20), शिवम कश्यप (वय – 18), विजय गाडकवाड (वय – 70) आणि फारूक चौधरी (वय – 54) अशी मृतांची नावे आहेत.

रिक्षा, कार, दुचारीसह किमान 30 ते 40 वाहनांना बसने उडवले. 100 मीटरच्या परिसरात पुढच्या सर्वच वाहनांना बसची धडक बसली. त्यानंतर सोलोमोन इमारतीची सुरक्षा भिंत तोडून बस इमारतीला धडकली. इमारतीच्या कॉलमला बसची धडक बसली.

पोलिसांच्या एका व्हॅनलाही बसने धडक दिली. त्यात एक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

शिवसेना मदतीला धावली

अपघाताची माहिती मिळताच तातडीने विभागातील शिवसैनिक मदतीला धावले. सर्वात आधी शिवसैनिकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना भाभा आणि शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भाभातील 5 गंभीर जखमींना शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी उपचारासाठी खासगी हबीब रुग्णालयात हलवले आहे. रात्री उशिरापर्यंत शेकडो शिवसैनिक यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्य करत होते.