हिंदुस्थानच्या भूमीवर दावा सांगणाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी फटकारले

बंगाल, बिहार आणि ओदिशावर आपला वैध दावा आहे, असे बांगलादेशच्या नेत्याने विधान करताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शेजारील देशाला फटकारले. बाहेरील शक्ती हिंदुस्थानच्या भूमीवर कब्जा करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही काय लॉलीपॉप खाणार का, असा प्रश्न त्यांनी केला. बांगलादेशातील प्रक्षोभक भाषणे याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन ममता यांनी विधानसभेतून राज्यातील जनतेला केले.

दरम्यान, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने जाहीर सभेत बंगाल, बिहार आणि ओदिशावर वैध दावा असल्याचे वक्तव्य केले होते. ‘पश्चिम बंगाल केंद्र सरकारने घेतलेल्या कुठल्याही निर्णयासोबत उभा राहील असे आम्ही नेहमीच म्हटले आहे. आमचे सरकार आणि आमचा पक्ष परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल. आपण जबाबदार नागरिक असून, आवश्यकतेशिवाय अधिक बोलणे योग्य नाही’, असे ममता यांनी सांगितले.