स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार? निवडणुकीची सत्ताधाऱ्यांना भीती का? रोहित पवारांचा सवाल

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यातच पुन्हा एकदा महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याची चर्चा आहे. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच निवडणुकीची सत्ताधारी पक्षाला एवढी भीती का वाटतेय? असा प्रश्न त्यांनी सत्ताधारी पक्षांना विचारला आहे.

‘X’ वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, ”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सुधारित अध्यादेश काढला जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही निर्माण होत असून लोकाभिमुख विकासाची चाके थांबली आहेत. अशी स्थिती असताना सरकार मात्र अद्यापही निवडणुका पुढे ढकलत आहे, हे योग्य नाही.”

ते पुढे म्हणाले की, ”निवडणुकीची सत्ताधारी पक्षाला एवढी भीती का वाटतेय? केवळ संविधान आणि लोकशाहीचं नाव न घेता सरकारने तत्काळ निवडणुका घोषित करून लोकशाहीचा आणि संविधानाचा सन्मान करावा”, असंही रोहित पवार म्हणाले.