बापरे… रोज 10 डोंबिवलीकरांना कुत्र्याचा चावा

>> आकाश गायकवाड

डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रोज सरासरी 10 जणांना कुत्रा चावत असल्याची माहिती समोर आली आहे. भटकी कुत्री झुंडीने फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पालिका क्षेत्रात केवळ एकच निर्बिजीकरण केंद्र असून श्वानसंख्या नियंत्रणासाठी पालिकेच्या उपाययोजना तोकड्या आहेत. परिणामी भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुत्र्यांची संख्या 80 हजारांच्या घरात गेली आहे.

डोंबिवली शहरात भटक्या श्वानांकडून हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नोव्हेंबर महिन्यात 315 नागरिकांना भटक्या श्वानांनी चावे घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचा अर्थ दिवसाला 10 ते 12 नागरिक भटक्या श्वानांच्या चाव्यांचे बळी ठरत आहेत. यात लहान मुलांचा आणि वृद्धांचा समावेश अधिक आहे. असे असतानाही पालिकेकडून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात नाहीत. शहरातील रस्त्यांवर टोळक्यांनी श्वान वावरताना दिसत आहेत. त्यात पालिकेकडून राबवण्यात येणारी निर्बिजीकरण प्रक्रिया अतिशय संथ आहे

एकच निर्बिजीकरण केंद्र

महापालिकेने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण आणि इअर नोचिंग केले जाते. त्यानंतर त्यांना त्याच भागात परत सोडले जाते. जानेवारी ते नोव्हेंबर या काळात12406 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. निर्बिजीकरण मोहिमेत सातत्य नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या ठिकाणी मोफत लसीकरण

महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय, रुक्मिणीबाई रुग्णालय, कोळसेवाडी दवाखाना, अन्सारी चौक दवाखाना आणि नेतिवली टेकडी दवाखाना या केंद्रांवर कुत्रा चावल्यावर मोफत लस उपलब्ध करून दिली जाते. यापैकी शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयात दररोज 10 ते 12 जण उपचारासाठी येत असल्याचे आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी सांगितले. जानेवारी ते ऑक्टोबर या काळात 18 705 जणांना मोफत लस देण्यात आली.

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके

टिटवाळ्यात काही दिवसांपूर्वी एका फिरस्ती महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा शिवाजीनगर परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अथर्व श्रीवास या आठ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्याच्या गुप्तांग व तोंडाला चावा घेतला आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने कल्याण शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

बेतूरकरपाडा शिवाजीनगर परिसरातील अर्थव श्रीवास हा मोहिंदर सिंग काबूल सिंग शाळेत दुसरीत शिकणारा मुलगा ट्यूशनवरून सायंकाळी ६ वाजता घरी परत येत होता. घराजवळील गल्लीमधून जात असताना अचानक त्याच्या मागून आलेल्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याने त्याच्या गुप्तांग व तोंडाला चावा घेतल्याने अर्थव गंभीर जखमी झाला. घाबरलेल्या अवस्थेत अथर्वने कुत्र्याच्या तावडीतून सुटका करत घर गाठले. मुलाचे वडील पप्पू श्रीवास यांनी या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परिसरातील नागरिकांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत.