पर्थ पराभवाला विसरून अॅडलेड ओव्हलवर ‘गुलाबी युद्धा’त उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा अवघ्या सव्वादोन दिवसांतच धुव्वा उडवला आणि दुसरी कसोटी दहा विकेट राखून जिंकत बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडक मालिकेत बरोबरी साधली. केवळ दोन दिवस पूर्ण खेळ झालेल्या या कसोटीचा निकाल 171.5 षटकांतच लागला. आता मालिकेत आघाडी घेण्यासाठी उभय संघ येत्या 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गॅबावर भिडतील.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानने पर्थ कसोटीत सुपर खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाला जिव्हारी लागेल असा पराभव दिला होता. त्या वेदना त्यांना असह्य झाल्या होत्या. त्या पराभवाने ते अक्षरशः पेटून उठले होते आणि पेटून उठल्यावर ते काय करतात त्याची झलक त्यांनी पहिल्याच दिवशी दाखवली होती. हिंदुस्थानचा पहिला डाव 180 धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रव्हिस हेडच्या वेगवान शतकाने ऑस्ट्रेलियाला मिळवून दिलेली आघाडीच त्यांच्या विजय निश्चित करणारी ठरली. विजयाचा पाया रचल्यानंतर त्यांना त्यावर कळस चढवायला फार वेळ लागला नाही. शनिवारी ऑस्ट्रेलियाने 157 धावांची आघाडी घेत कसोटीवर पकड केली होती. पर्थवर हिंदुस्थानी फलंदाजांनी जो अद्भुत खेळ केला होता त्याची पुनरावृत्ती अॅडलेडवरही होईल, अशी क्रिकेटप्रेमींना भाबडी आशा होती. पण पॅट कमिन्सच्या वेगवान माऱयाने हिंदुस्थानी फलंदाजांना डोकेसुद्धा वर काढू दिले नाही. शनिवारी 5 बाद 125 अशी भयावह अवस्था करत ऑस्ट्रेलियाने ‘गुलाबी युद्ध’ जिंकले होते. फक्त तिसऱया दिवशी औपचारिकता पूर्ण केली गेली. अवघ्या 97 चेंडूंत कसोटीचा निक्काल लावत बरोबरी साधली.
संधीचा फायदा उठवण्यात कमी पडलो…
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत 3-0 ने धूळधाण उडाल्यानंतर रोहित शर्मा पर्थ कसोटीत अनुपस्थित होता. पण त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने गोलंदाजीची कमाल करत हिंदुस्थानला प्रचंड मोठा विजय मिळवून दिला होता, मात्र दुसऱ्या कसोटीत रोहित परतला आणि हिंदुस्थानच्या दारुण पराभवाची मालिकाही परतली. आम्ही निराशाजनक खेळ केला. आम्ही जिंकण्यासाठी चांगले खेळूच शकलो नाही आणि ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा सरस खेळली. आम्हाला कसोटीत अनेकदा संधी लाभली, पण आम्ही त्या संधीचे सोने करू शकलो नाही. हेच आमच्या पराभवाचे कारण असल्याचे रोहित शर्मा म्हणाला. प्रत्येक कसोटी आव्हानात्मक असेल. गुलाबी चेंडूवर खेळणे आमच्यासाठी आव्हानात्मक ठरणार, याची कल्पना होती. आता आम्ही आमचे सर्व लक्ष गॅबावर पेंद्रित करणार आहोत.
12.5 षटकांत काम तमाम
हिंदुस्थानने कसोटी दुसऱ्या दिवशीच गमावली होती. तरीही आज ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीकडून अपेक्षा होती, पण ती अपेक्षा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वाढूच दिली. शनिवारच्या धावसंख्येत हिंदुस्थानी फलंदाज केवल 50 धावांची भरच घालू शकले. पॅट कमिन्सने भन्नाट मारा करत 3 विकेट घेत अवघ्या 12.5 षटकांत हिंदुस्थानी फलंदाजीचा खेळ खल्लास केला. कमिन्सने आपल्या कसोटी कारकीर्दीत 12 व्यांदा पाच विकेट टिपण्याची किमया साधली. शनिवारच्या नाबाद पंत (28) आपला खेळ वाढवता आला नाही, पण पहिल्या डावात सर्वाधिक 42 धावा करणाऱया नितीश रेड्डीने दुसऱया डावातही तितक्याच धावा चोपून काढल्या. त्याने 47 चेंडूंत 42 धावांची फटकेबाज खेळी करत संघाला 175 पर्यंत नेले. मात्र आज मैदानात उतरलेल्या आर. अश्विन (7), हर्षित राणा (0), बुमरा (नाबाद 2) आणि सिराज (7) यांचे काहीएक चालले नाही. मग विजयासाठी 19 धावा करायला मैदानात उतरलेल्या मॅकस्विनी (10) आणि ख्वाजाने (9) 3.2 षटकांत संघाच्या विजयावर शिक्का मारला.
शमीचे पुनरागमन लांबणीवरच
मोहम्मद शमी सध्या फिट असला तरी तो कसोटीत पुनरागमन करण्याची शक्यता कमीच आहे. सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकात खेळताना त्याचा गुडघ्याला पुन्हा सूज आली होती. त्यामुळे त्याच्या पुनरागमनासाठी आम्हाला कोणतीही घाई नसल्याचे संकेत रोहित शर्माने दिलेत. सध्या त्याच्या फिटनेसवर क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज लक्ष ठेवून असल्याचेही शर्माने सांगितले. त्यामुळे तो या मालिकेत पुनरागमन करेल की नाही, याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे.
पिंक नव्हे ‘जिंक’णारा चेंडू
‘पिंक’ अर्थातच ‘गुलाबी’ चेंडूच्या युद्धात अॅडलेड ओव्हलवर ऑस्ट्रेलियाला कुणीच हरवू शकलेला नाही. सलग आठवी कसोटी याच मैदानावर ते जिंकलेत. ‘पिंक बॉल’ त्यांच्यासाठी जिंकणारा बॉल ठरतोय. दिवस-रात्र कसोटीतही ऑस्ट्रेलियाने आपला रेकॉर्ड भन्नाट ठेवला आहे. 13 पैकी 12 वी कसोटी ते जिंकलेत. केवळ एकच कसोटी ते हरलेत.
कसोटीही गमावली अन् स्थानही गमावले
हिंदुस्थानने पर्थ कसोटीत विजय मिळवत आपले जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले होते. मात्र गुलाबी चेंडूवर दारुण पराभव सहन केल्यानंतर आता त्यांना आपले अव्वल स्थानही गमवावे लागले आहे. या पराभवामुळे हिंदुस्थान थेट तिसऱया स्थानावर फेकला गेला असून ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान संपादले आहे आणि श्रीलंकेवर मात करणारा दक्षिण आफ्रिकन संघ दुसऱया स्थानावर पोहोचला आहे. केबरहा (पोर्ट एलिझाबेथ) येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीतही दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित असल्यामुळे ते मालिका 2-0 ने जिंकत आपले दुसरे स्थान आणखी मजबूत करू शकतील. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत हिंदुस्थानच्या खात्यात सर्वाधिक 110 गुण असले तरी कसोटी विजयाच्या सरासरीनुसार संघाच्या स्थानात बदल केला जात असल्यामुळे 62 गुण मिळवणारा आफ्रिकन संघ 64 गुणांसह दुसऱया क्रमांकावर पोहोचला आहे. बदललेल्या या परिस्थितीमुळे हिंदुस्थानला जून महिन्यात लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱया अंतिम सामन्यासाठी आपले स्थान निश्चित करण्यासाठी पुढील तिन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे.