मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत; विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवार यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतही गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आकडेवारी मांडत विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर एक उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात तसं वातावरण आता दिसत नाही. पण उगीचच आरोप करणं योग्य नाही, कारण माझ्याकडे त्यासंबंधिची अधिकृत माहिती नाही. साधारणतः या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षांना एकूण किती मतं मिळाली? आणि त्यांचे उमेदवार किती निवडून आले? याची काही आकडेवारी गोळा केली आहे. आता काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एकूण 80 लाख मतं मिळाली आहेत. आणि काँग्रेसचे 15 आमदार निवडून आले. आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांना कमी मतं असून 79 लाख मतं पडली. म्हणजे काँग्रेस पेक्षा एक हजार मतं कमी. आणि शिंदेंचे 57 उमेदवार निवडून आलेत. म्हणजे 80 लाख मतं मिळालेल्यांचे 15 उमेदवार आणि 79 लाख मतं मिळालेल्या 57 उमेदवार निवडून आले. आमच्या पक्षाला एकूण 72 लाख मतं मिळाली. आणि आमचे उमेदवार निवडून आले 10 . तर अजित पवार गटाला एकूण 58 लाख मतं पडली आणि त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. म्हणजे 72 लाख मतं मिळाल्यांचे 10 आणि 58 लाख मतं मिळाल्याचे 41. ही आकडेवारी आहे. आम्ही त्याच्या खोलात गेलो नाही. प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार निवडून आले हे पाहिलं. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी निवडणुकीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ईव्हीएम बाबत भाष्य करणं योग्य नाही. आज सकाळी विधानसभेमधून थोडी माहिती घेतली. त्यांचं (सत्ताधारी) म्हणणं एकच होतं, की लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी यांची (विरोधकांची) तक्रार नव्हती. आणि तुम्ही आताच कसे काय बोलता? पण अलिकडेच चार निवडणुका झाल्या. हरयाणामध्ये निवडणुकीच्या काळात मी स्वतः गेलो होतो. तिथे भाजपची अवस्था अत्यंत कठीण होती. पण भाजपा सत्तेवर आली. त्याचवेळेला जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथे काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राची निवडणूक झाली ती सगळ्यांनी बघितली. इथं भाजपला यश आलं. याच वेळी झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की दोन निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकले, एक ठीकाणी आम्ही जिंकलो. त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्यातून एकच चित्र दिसलं मोठी राज्य जी आहेत तिथे भाजप आहे. छोटी राज्य आहेत तिथे अन्य पक्ष आहेत, असेही शरद पवार यांनी अधोरेखित केले.

मारकडवाडीला उद्या मी जाणार आहे. तिथल्या लोकांशी चर्चा करणार आहे. उत्तम जाणकरांसह इथल्या दोन उमेदवारांच्या सभा मी बघितल्या. 40-50 वर्षे सभा करतोय. आता यांची इथली सभा बघितल्यानंतर निकाल काय लागणार? हे सांगायला ज्योतीषाची गरज नव्हती. त्या जिंकणार हे चित्र होतं. वातावरण हे अनुकूल होतं, निकाल हे अनुकूल नाहीत. त्याची कारणमिमांसा सांगणं जोपर्यंत अधिकृत माहिती नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

निवडणूक होऊन गेली. आता तर काही निवडणूक नव्हती. प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या (मारकडवाडी) लोकांनी आमच्या गावात कसं मतदान पडलं? हे बघण्यासाठी त्यांनी जुन्या पद्धतीनं (बॅलेट पेपरवर) मतदान करण्याचं ठरवलं. त्याला बंदी का? बंदी करण्याचं कारण काय? कोणता कायदा आहे? त्यावेळी 144 कलम लावलं. म्हणून आम्ही तिथे जाण्याचं आम्ही ठरवलं. लोकांशी बोलू त्यांच्याकडून समजून घेऊ. अधिकारी असतील तर त्यांचंही मत घेऊ, असे शरद पवार म्हणाले.