राजधानी दिल्लीतील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. दिल्ली गँगस्टर्सच्या कंट्रोलमध्ये आहे. शूटर्सना अटक करण्यात येत आहे, पण या घटनांमागील मास्टरमाइंड निर्धास्त फिरत आहेत, असा आरोप अरविंज केजरीवाल यांनी केला.
राजधानीत आज सकाळी विश्वासनगरमध्ये सुनील जैन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांमध्ये इतकी हिंमत कुठून आली? माझी ओळख असलेले अनेक व्यापारी दिल्ली सोडत आहेत. दिल्लीत महिलांना असुरक्षित वाटतंय. रोज बलात्काराच्या घटना घडत आहेत. दिल्ली पोलीस दिल्लीकरांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरत आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
अमित शाह जी ने दिल्ली को बर्बाद कर दिया। दिल्ली को जंगल राज बना दिया। चारों तरफ़ लोग दहशत की ज़िंदगी जी रहे हैं। बीजेपी से अब दिल्ली की क़ानून व्यवस्था नहीं संभल रही। दिल्ली वालों को एकजुट होकर आवाज़ उठानी होगी। https://t.co/UDmn45100o
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 7, 2024
‘दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राची’
दिल्ली पोलीस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते. अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी अमित शहा यांची आहे. दिल्लीतील मतदारांनी आम्हाला शाळा, हॉस्पिस्टल्सची व्यवस्था ठीक करण्याची जबाबदारी दिली आहे. आम्ही त्यांना हॉस्पिटल्स आणि शाळा ठीक करून दिल्या आहेत. दिल्लीच्या मतदारांनी भाजपला कायदा-सुव्यवस्था राखण्याची एकच जबाबदारी दिली आहे. परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
मी या मुद्द्यावर राजकारण करत नाही. दिल्लीकरांच्या वतीने माझी अमित शहा यांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी दिल्ली वाचवण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. दिल्लीत शाहदरामधील विश्वासनगरमध्ये आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी 58 वर्षीय व्यापारी सुनील जैन यांची गोळ्या घालून हत्या केली. जैन हे मॉर्निंग वॉक करून आपल्या स्कुटीवर घरी परतत होते. सुनील जैन यांचे भांड्यांचे दुकान आहे. हल्लेखोरांनी सुनील जैन यांच्यावर सहा ते सात गोळ्या झाडल्या. त्यामुळे जैन यांचा जागीच मृत्यू झाला, असे शाहदराचे डीसीपी प्रशांत गौतम यांनी सांगितले. गोविंदपुरीमध्ये आणखी एक घटना घडली. यात कॉमन टॉयलेटच्या स्वच्छतेवरून दोन गटात तुफान राडा झाला. यात एकजण ठार तर दोघे जखमी झाले.