आठवड्यातील सुट्टीचा दिवस म्हणून रविवारी मुंबईकर फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडतात. मात्र, घराबाहेर पडण्याआधी प्रवाशांनी रेल्वेचे रविवारचे वेळापत्रक पाहणे गरजेचे आहे. कारण 8 डिसेंबर रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगब्लॉक दरम्यान लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशीराने धावतील. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.
मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि इतर देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत माटुंगा- मुंलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या आणि तेथून निघणाऱ्या मार्गावरील जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेसोबतच हार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते 4.40 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे या मार्गावर ब्लॉक असेल.