सिडकोच्या तिरुमला ऑईलमध्ये 1 डिसेंबर रोजी स्फोट झाल्याने पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी तिघांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन सख्ख्या भावांचा उपचार चालू असताना काल रात्री मृत्यू झाला असून, मुलाच्या वडिलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
उस्माननगर रोडवरील सिडको औद्योगिक वसाहतीत भास्कर कोत्तावार यांच्या मालकीच्या तिरुमला ऑईल मिलला रविवार 1 डिसेंबर रोजी मोठी आग लागली होती. या आगीत प्रचंड नुकसान झाले होते. या आगीत विजय भास्कर कोत्तावार व हर्षद भास्कर कोत्तावार हे दोन सख्खे भाऊ तसेच मिलचे मालक भास्कर कोत्तावार, सुनिल बंडेवार व सुधाकर बंडेवार हे गंभीर जखमी झाले होते.
विजय, हर्षदची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र शुक्रवारी उपचार सुरू असताना दोघांचे निधन झाले. मिलचे मालक भास्कर कोत्तावार हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
दोन्ही सख्या भावांचा मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी नांदेड येथे आणण्यात आले. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, या आगीत सदर मिलचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घटनेदरम्यान मिलच्या शेजारी असलेला टेम्पो क्र. एमएच- 26-सीएच-700 हा जळून खाक झाला होता.