बुलेट ट्रेनने शेती चिरडली; शेतकऱ्यांच्या हातावर चिरीमिरी

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अंबरनाथ, बदलापूरमधील पंधरा गावांमधून राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अतिउच्च दाब वाहिन्या टाकल्या जात आहेत. मात्र गुंठ्याला सात ते आठ लाख रुपयांचा बाजारभाव असताना बाधित शेतकऱ्यांच्या हातावर एक लाख रुपये ठेवून खुलेआम फसवणूक करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत नुकसानभरपाईच्या नावाखाली हातावर चिरीमिरी ठेवणाऱ्या सरकारचा निषेध केला. यावेळी ८१ बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली.

ऊर्जा व कामगार विभागाकडून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पडघा ते मालेगाव इलेक्ट्रोड अतिउच्च दाब विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यात अंबरनाथ बदलापूरमधील सांबारी, शिंधीपाडा, लव्हाळी, सोनावळा, चोण, रहाटोली, एरंजाड, आंबेशीव, चरगाव, साई, मूळगाव, उमरोली, ढोके-दापिवली, जांभिळघर या १५ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिनी टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या परिसरात प्रतिगुंठा ७ ते ८ लाख रुपये दर असताना शासनाकडून शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देऊन त्यांच्या हातावर ९० हजार ते १ लाख रुपये गुंठा इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ८१ बाधित शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत वाढीव दर देण्याची मागणी केली आहे, असे भालचंद्र भोईर यांनी सांगितले.

फेरचौकशी करण्याच्या सूचना 

शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उल्हासनगर प्रांत अधिकाऱ्यांना पुन्हा फेरचौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती बाधित शेतकरी सजील मुल्ला यांनी दिली. दरम्यान प्रकल्पासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची घोषणा किंवा नोटीस दिली नसून टॉवर उभारलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही शेतकऱ्याचा सर्व्हे झाला नसल्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले