सातपाटीच्या पापलेटांचे ‘वजन वाढले’, मासेमारी हंगाम पंधरा दिवस उशिरा सुरू केल्याने मच्छीमारांना फायदा

सांकेतिक चित्र

पापलेट म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यात सातपाटीच्या पापलेटची चव काही औरच. यावर्षीं ठाणे जिल्ह्यातील सर्वच मच्छीमारांनी मासेमारी हंगाम ३१ जुलैऐवजी १५ ऑगस्ट रोजी सुरू केला होता. त्यामुळे पंधरा दिवस उशिरा मासेमारी सुरू झाल्याने सातपाटीच्या समुद्रात पापलेटांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली असून एकेक पापलेटचे वजन जवळपास अर्धा किलोहून अधिक भरत आहे. सरंग्याची सध्या तुफान आवक होत असल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. पापलेटची ही आवक गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मासेमारांनी सांगितले.

■ सातपाटी सर्वोदय मच्छीमार संस्था व सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी संस्थेच्या मच्छीमारांनी जवळपास १७३ बोटींच्या मदतीने आतापर्यंत १८७ टन इतकी विक्रमी पापलेट मासेमारी केली आहे.

■ पापलेटांचा दर आकारमानावर अवलंबून असल्याने यंदाच्या वर्षी मिळालेल्या पापलेटची घाऊक बाजारात ६०० रुपयांपासून ते १ हजार ४५० प्रति किलो इतकी किंमत मच्छीमारांना मिळत आहे.

■ मुबलक पापलेट आणि चांगले दर यामुळे सातपाटीच्या मच्छीमारांना सुगीचे दिवस आले आहेत. सातपातीप्रमाणेच वसईतील मच्छीमारांनादेखील यंदाच्या हंगामात पापलेटचा खजाना हाती लागला आहे.

■ यंदा वसईतील मच्छीमारांना ५०० टनाहून अधिक पापलेट जाळ्यात सापडल्याची माहिती समोर आली आहे. पापलेटची ही आवक गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने मच्छी मारांनी आनंद व्यक्त केला.

बंदीचा कालावधी वाढवणे आवश्यक 

२०११ ते २०१५ दरम्यान पापलेट उत्पादनात बरीच घट झाली होती. २०२२-२३ या दोन वर्षांच्या मासेमारी हंगामात पापलेटची आवक एवढी घटली होती की ही प्रजाती नामशेष होईल की काय अशी भीती मच्छीमारांकडून व्यक्त होत होती. आता त्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून या पापलेटचा आकारमान वाढावा आणि मच्छीमारांना अधिक लाभ मिळावा यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवणे आवश्यक असल्याची माहिती ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे माजी अध्यक्ष जयकुमार भाय यांनी दिली.