पिंपरीतील पोलिसांना आता वाढदिवसाला मिळणार हक्काची सुट्टी

कधी बंदोबस्त, कधी नैसर्गिक आपत्ती, सणोत्सव, व्हीआयपी दौरा, अपघात, राजकीय कार्यक्रम, निवडणुका, नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि गुन्हेगारी यासह शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस दल कायम तत्पर असते. मात्र, कामाचा ताण, शारीरिक, मानसिक थकवा आणि वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असताना सुरू असलेली तारेवरची कसरत यामध्ये पोलिसांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. मात्र, आता पिंपरी-चिंचवड पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला हक्काची सुट्टी मिळणार आहे. इतकेच नाही तर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. वाढदिनी पोलिसाला सुट्टी देण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू होऊन सहा वर्षे उलटली असून आयुक्तालय काही प्रमाणात स्थिरावले आहे. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक आयुक्तांनी पोलिसांवरील ताण लक्षात घेऊन काही उपक्रम राबविले. मात्र, मनुष्यबळासह अनेक अडचणी असल्याने सुट्ट्यांचे नियोजन काहीसे अवघड ठरत असे. कोरोना काळात नागरिक घरी सुरक्षित असताना पोलीस दल मात्र जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरले होते. यामध्ये काही पोलिसांनी जीवही गमावला. अनेकदा पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी राहावे लागते. सार्वजनिक सण, समारंभ, मोर्चे, नेत्यांचे दौरे, शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर येतो. परिणामी बहुतांशी पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततचा बंदोबस्त आणि कामाच्या ताणामुळे पोलिसांना कुटुंबालादेखील वेळ देता येत नाही. अति ताणामुळे पोलिसांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. अनेक वेळेला पोलिसांना आपला वाढदिवसही साजरा करता येत नाही.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले आहे. एखादा पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी गंभीर अडचणीत असल्यास पोलीस आयुक्तांकडून वैयक्तिकरीत्या चौकशी करण्यात येते. आता पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला सुट्टी जाहीर करत पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले आहे. तर, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छापत्र देण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.

पोलीस हा कायदा सुव्यवस्थेचा मुख्य घटक आहे. सतत कामात असल्याने त्यांच्यावरील शारीरिक आणि मानसिक ताण वाढत असतो. वाढदिवसासारख्या दिवशी आपण कुटुंबाला वेळ देता यावा अशी अपेक्षा असते. या पाश्र्वभूमीवर वाढदिवसाला सुट्टी देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांसाठी भविष्यात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. • विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड