सावकारी प्रकरणात दोन तक्रारदारांकडून सोने घेऊन फसवणूक करणाऱ्या तीन सावकारांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी 146 तोळे सोने जप्त केले. याची किंमत सव्वा कोटी रुपये असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला आहे. सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेची ही संयुक्त कारवाई असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. विजय वसंतराव चौधरी, कल्पना विजय चौधरी, अजिंक्य अनिल चौधरी (रा. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत.
सातारा शहर पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी दोन सावकारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. सुरुवातीला सातारा शहर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर पुढे याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. या दोन्ही प्रकरणांत विजय चौधरी, कल्पना चौधरी, अजिंक्य चौधरी यांच्याविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या प्रकरणात तक्रारदार मनोज गणपती महापरळे यांनी संशयितांकडून वेळोवेळी 1 कोटी 92 लाख रुपये रक्कम घेतली. यामध्ये पहिल्यांदा अडीच टक्के व्याजाने, तर नंतर दहा टक्के व्याजाने ती रक्कम घेतली. त्या रकमेच्या बदल्यात तक्रारदार यांच्याकडून ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 50 लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण ठेवला. 2018 ते 2023 या कालावधीत व्याजासह 3 कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली. मात्र, संशयितांनी दागिने आणि प्लॉट परत न दिल्याने तक्रारदारांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दुसऱ्या प्रकरणात मृत तक्रारदार शकुंतला अशोक शिंदे यांनी संशयित आरोपींकडून 19 लाख 98 हजार रुपये रक्कम अडीच टक्के व्याजाने घेतली होती. त्यासाठी 81 तोळे वजनाचे दागिने गहाण ठेवले होते. तक्रारदार महिलेने संशयित आरोपीला 20 लाख 49 रुपये देऊनही 81 तोळे दागिने परत केले नाहीत. यामुळे त्यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अशाप्रकारे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन तपासाला सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी तपास करीत असताना पाठपुरावा व तांत्रिक तपास करून आरोपीच्या विरोधात सबळ पुरावा प्राप्त केला. त्यानुसार दोन्ही गुन्ह्यांतील खासगी सावकार विजय चौधरीकडून 146 तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात साताऱ्यातील दोन सराफांना नोटीस बजावली.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक आश्लेषा हुले, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस प्रमोद नलावडे, राजू मुलाणी, विकास इंगवले, सूरज गवळी, संजय गोरे, संतोष राऊत, संतोष सपकाळ, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे यांनी केली.
दागिने मूळ मालकांच्या ताब्यात
खासगी सावकारांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले दागिनेही हस्तगत केले. हे दागिने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या हक्काचे दागिने मिळतील, की नाही या विवंचनेत असलेल्या तक्रारदारांच्या चेहऱ्यावर पोलिसांच्या कामगिरीने समाधानाचे हसू फुलले होते.