केंद्रात भाजपच्या सत्तेला ‘टेकू’ देणाऱ्या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने आसाममधील बीफबंदीला विरोध केल्याने ‘एनडीए’मध्ये धुसफुस सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘जेडीयू’ने याआधी शेतकऱयांच्या मुद्दय़ावरही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे आता ‘एनडीए’ आणि मित्रपक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
आसाममधील हिमंता बिस्व सरमा सरकारने राज्यात ‘बीफ बॅन’चा निर्णय घेतला आहे. याला ‘जेडीयू’ने जाहीर विरोध करताना ‘राजधर्मा’ची आठवण करून दिली आहे. आसाममधील बीफ बंदीचा निर्णय दुर्दैवी असून नागरिकांना खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य हवे, अशी भूमिका ‘जेडीयू’ने घेतली आहे. हा निर्णय ‘राजधर्मा’विरोधातील असून समजण्यापलीकडला असल्याचे जेडीयूने म्हटले आहे. लोक काय खातात आणि कोणते कपडे घालतात याच्याशी सरकारचा काय संबंध, असा सवाल जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी केला आहे.
शेतकऱयांना दिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत?
नितीशकुमार यांच्या जेडीयूने केंद्र सरकारला अनेक वेळा विरोध केला आहे. अलीकडेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून तटस्थ भूमिका घेतली होती. उत्तर प्रदेशातील कावड यात्रेदरम्यान दुकानांवर नामफलक लावण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाचाही विरोध केला होता. विशेष म्हणजे राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण का करीत नाही, असा सवाल केला असता जेडीयूने त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.