
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि सरकारमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. कारागृहात असलेल्या इम्रान यांनी आपल्या समर्थकांना पैख्तुनवा प्रांताची राजधानी पेशावर शहरात 13 डिसेंबर रोजी जमण्याचे आवाहन केले आहे. या प्रांतात इम्रान यांच्या पीटीआय पक्षाची मोठी ताकद आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कायदेभंग चळवळ सुरू करण्याची सूचना समर्थकांना दिली आहे.
इम्रान खान यांनी विविध मागण्या करताना पक्षाचा 25 नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथील निषेध मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला गेला. याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच या मोर्चाला पांगवण्यासाठी झालेल्या हिंसाचारात 12 जण दगावले. मागील वर्षी 9 मे रोजी झालेल्या हिंसाराचात 8 जणांना जीव गमवावा लागला होता. याशिवाय पीटीआयच्या अटक केलेल्या नेत्यांना सोडण्याची मागणीही त्यांनी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास 14 डिसेंबरपासून पाकिस्तानमध्ये कायदेभंग आंदोलन करण्याचा इशाराही इम्रान खान यांनी दिला.
दरम्यान, पाकिस्तान सरकारने 25 नोव्हेंबरच्या मोर्चात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगितले. तसेच मागील वर्षी पीटीआयच्या समर्थकांनी लष्कराच्या अधिकाऱयांवर हल्ला केला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. गुरुवारी सरकारने 9 मे रोजीच्या हिंसाचारावरून इम्रान खान यांना दोषी मानले. परंतु इम्रान यांनी सर्व आरोप फेटाळताना सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.