बनावट सोने देऊन बँकेची फसवणूक

बनावट सोने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेला मालाड पोलिसांनी अटक केली. सपना भट असे तिचे नाव आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे मालाड येथील एका बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. 2021 मध्ये पाच जणांनी सोने तारण ठेवून कर्जासाठी अर्ज केला होता. त्यानुसार बँकेने त्या पाचजणांना 39 लाखांचे कर्ज दिले होते. कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली होती. तेव्हा सपना हिने बँकेत गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम केले होते. कर्ज दिल्यानंतर त्या पाचजणांनी एकही हप्ता भरला नव्हता. त्याना बँकेने नोटीस पाठवून सोने लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. सोने लिलावापूर्वी दागिन्यांचे फेरमूल्यांकन केले. ते दागिने बँकेच्या पॅनलवरील एका ज्वेलर्सकडे दिले. ज्वेलर्सने तपासणी केली तेव्हा ते सोने बनावट असल्याचे लक्षात आले. ज्वेलर्सने याची माहिती बँकेला दिली. त्यानंतर बँकेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी भटला ताब्यात घेऊन अटक केली.