दिल्ली क्राईम ब्रँच आणि तोतया सीबीआय अधिकाऱ्याने अटकेच्या कारवाईची भीती दाखवून वृद्धाकडून 71 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोरेगाव येथे राहणारे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. सप्टेंबर महिन्यात त्याना एका नंबरवरून पह्न आला. त्याने तो दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी असल्याचे भासवले. विमानतळावर एक कुरिअर आले असून त्यात एमडीएमए ड्रग सापडल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तो पह्न दुसऱया ठगांकडे ट्रान्स्फर केला. त्याने तक्रारदार याना माहिती विचारली. त्यानंतर त्याने व्हिडीओ कॉल करून आधारकार्ड घेऊन समोर बसण्यास सांगितले. व्हिडीओ कॉलद्वारे स्टेटमेंट घ्यायचे असल्याने एका रूममध्ये या असे त्यांना सांगितले. चौकशी होईपर्यंत त्या रूममध्ये कोणास येऊ देऊ नका. कॅमेऱ्यासमोर बसून राहा असे त्यांना सांगितले. त्याचदरम्यान ठगाने त्याना बँक खात्यात 38 कोटी रुपये आल्याच्या भूलथापा मारल्या. काही वेळाने त्याना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. दिल्ली कोर्टाचे ते पत्र असल्याचे ठगाने भासवले. व्हिडीओ कॉल होईपर्यंत याची माहिती कोणालाही देऊ नका असे ठगाने सांगितले. चौकशीसाठी संपत्तीचे पेपर घेऊन दिल्लीला यावे लागेल अशा त्याने भूलथापा मारल्या. ठगाने भीती दाखवून त्यांच्याकडून 71 लाख रुपये उकळले.