ताडदेवमधील कोळी महिलांचे शौचालय पुन्हा उभारले; पुनर्वसनावर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती ठाम

ताडदेवमधील बेलासिस पुलाजवळ पारंपरिक मासे विक्रेत्या कोळी महिलांना कोणतीही नोटीस तसेच पुनर्वसनाचे ठोस आश्वासन न देता त्यांचे गाळे आणि शौचालय मुंबई महापालिकेच्या डी विभागाने तोडले होते. याबाबत माध्यमातून आवाज उठवल्यानंतर महापालिकेने पत्रे टाकून तात्पुरत्या स्वरूपाचे शौचालय पुन्हा उभारले आहे. मात्र, पुलामुळे विस्थापित होणाऱ्या 36 मासे विव्रेत्या महिलांचे आधी पुनर्वसन करा, अशी भूमिका अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने घेतली आहे.

ब्रिटिशकालीन बेलासिस पूल धोकादायक झाल्यामुळे तो तोडण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, या पुलाच्या बाजूला असलेल्या विक्रेते, फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, 1971 पासून मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱया 36 कोळी महिलांना परवाने असूनही काही गाळे आणि महिलांचे शौचालय डी विभागातील कर्मचाऱयांनी तोडले होते. दरम्यान, पालिका अधिकाऱयांनी सोमवारी मासे विव्रेत्या महिलांना विभाग कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले आहे. त्यानंतर मंगळवारी पालिकेवर काढण्यात येणा-या मोर्चाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.