क्षयरोग रुग्ण शोधण्याची गती वाढवणे, क्षयरोगाचा मृत्यू दर कमी करणे, क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणे हे उद्दिष्ट ठेवून मुंबईतील 26 प्रभागांमध्ये 7 डिसेंबर ते 24 मार्चपर्यंत अशा 100 दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम राबवण्यात येणार असून देशातून 2025 अखेर क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
त्या दृष्टीने या मोहिमेची विभागनिहाय अतिजोखमीच्या लोकसंख्येचे आणि क्षयरुग्णांचे मॅपिंग करण्यात येणार आहे.
अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट व ‘एक्स रे’च्या मदतीने क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येईल.
क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींना पोषणासाठी निक्षय पोषण योजनेचा लाभ तसेच ‘निक्षय मित्र’ बनवून पोषणासाठी सहाय्य देण्यात येईल.
क्षयरोग नसलेल्या परंतु क्षयरुग्णाच्या संपका&त असलेल्या व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधित उपचार देण्यात येणार आहेत.
क्षयरुग्णांमध्ये दोन आठवडय़ांपेक्षा जास्त खोकला, ताप, रात्री घाम येणे, छातीत दुखणे, थकवा येणे, वजन कमी होणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे, बेडक्यामध्ये रक्त येणे, जुना आजार ही लक्षणे आढळतात.