शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब कॅण्टीनवर आजपासून कधीही धडक देऊन अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक तिथे दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान निकृष्ट, हलक्या दर्जाचे अन्न, खाद्यपदार्थ ग्राहकांना देणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाताळ आणि थर्टी फर्स्ट पार्टीचे नियोजन करण्यास आता सुरू झाले आहे. कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईकांसमवेत हॉटेल, रेस्टॉरंट किंवा क्लब कॅण्टीनमध्ये जाऊन विविध खाद्यपदार्थांवर ताव मारण्याचा आनंद लुटला जातो. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल, रेस्टॉरंट किंवा क्लब कॅण्टीन चालविणाऱयांकडून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाऊ नये. तसेच तेथे खालेल्या अन्नातून विषबाधेसारखी घटना घडू नये याकरिता एफडीएने पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएकडून 5 ते 31 डिसेंबरपर्यंत शहरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान एफडीएचे पथक कुठल्याही हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब कॅण्टीनवर धडक देऊन तेथील अन्नपदार्थांची तपासणी करणार आहेत. त्या ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन काटेकोरपणे केले जाते की नाही याची खातरजमा करण्यात येईल. या वेळी जो हॉटेल, रेस्टॉरंट किंवा क्लब कॅण्टीनमध्ये नियम पायदळी तुडवले जात असल्याचे आढळून येईल अशांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एफडीएचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिला आहे.