रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो रेट कायम ठेवून व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. रेपो रेट दर कायम ठेवल्यामुळे गृहकर्जाच्या महागड्या ईएमआयमुळे त्रस्त असलेल्या नोकरदारांचीही घोर निराशा झाली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी दराचा अंदाज कमी केला आहे. त्यामुळे देशात महागाईचा आणखी भडका उडणार आहे, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. महागाईने त्रस्त असलेले सर्वसामान्य आणि नोकरदार यांना व्याजदरात कपात होईल, अशी आशा वाटत होती. मात्र, यावेळी दास यांनी रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तीन दिवसांच्या चर्चेनंतर एमपीसीने व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे स्वस्त कर्ज आणि ईएमआयमध्ये कपात होण्याच्या आशा पुन्हा धुळीला मिळाल्या आहेत. आरबीआयने रेपो दरात कोणतीही कपात न करण्याची ही अकरावी वेळ आहे.
जीडीपी घटणार
रिझर्व्ह बँकेने 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक विकास दर अर्थात जीडीपीचा दर 7.2 टक्क्याऐवजी 6.6 टक्के इतका राहील, असे म्हटले. जीडीपीचा दर कमी झाला तर महागाई भडकू शकते. दरम्यान, केंद्रीय बँकेबरोबरच राजकीय आव्हाने ही सर्व देशांसाठी मोठी समस्या आहे. महागाईचे ताजे आकडे आणि दुसऱ्या तिमाहीतील कमी जीडीपी दर हेदेखील चिंतेचे कारण आहे, असे दास यांनी म्हटले.
शेतकऱ्यांना दोन लाखांचे बिनव्याजी कर्ज
गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता बिनव्याजी कृषी कर्जाची मर्यादा 1 लाख 60 हजारांवरून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल तसेच इतर अनेक कृषी समस्यांमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे.