क्रिडा विश्वातील महत्वाच्या घडामोडी

जान्हवी जाधव, ऋषभ घुबाडे अव्वल

मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला गटाच्या मल्लखांब स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक गटात डहाणूकर महाविद्यालयाची जान्हवी जाधव अव्वल आली तर पुरुषांमध्ये रहेजा महाविद्यालयाचा ऋषभ घुबाडे पहिला आला. या स्पर्धेचे नुकतेच एल. एस. रहेजा महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. तसेच सांघिक खेळात विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (महिला) आणि एम. एल. डहाणूकर महाविद्यालय (पुरुष) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
संघ निकालः
महिला गट ः 1. विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, 2. डहाणूकर महाविद्यालय, 3. भवन्स महाविद्यालय.
पुरुष गट ः 1. डहाणूकर महाविद्यालय, 2. अण्णा लीला महाविद्यालय, 3. भवन्स महाविद्यालय.

डॉ. आंबेडकर, महर्षी दयानंद महाविद्यालयाला जेतेपद

51 व्या आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने तर मुलींच्या गटात महर्षी दयानंद महाविद्यालयाने (ब संघ) विजेतेपद संपादले. मुलांच्या अंतिम सामन्यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने एस.एस.टी. महाविद्यालयाचा 24-20 असा 4 गुणाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात आंबेडकरच्या आकाश साळवी, जितेंद्र यादव यांनी चढाईमध्ये चमकदार कामगिरी केली व सनी भगतने उत्कृष्ट पकड करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. मुलींच्या गटात महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘ब’ संघाने त्यांच्याच म्हणजे महर्षी दयानंद महाविद्यालयाचा (अ संघ) 28-26 असा दोन गुणांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात महर्षी दयानंदच्या रिया मडकईकर, नेहा गुप्ता यांनी जोरदार कामगिरी करत विजय खेचून आणला.

भोसले क्रिकेट संघाचा विजय

अद्वैत केकणच्या (3 विकेट आणि 25 धावा) प्रभावी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भोसले क्रिकेट संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित मुंबई क्रिकेट क्लब अकॅडमी 12 वर्षांखालील मुले टॅलेंट सर्च क्रिकेट लीगच्या दुसऱया फेरीत एमसीसी ठाणे संघाविरुद्ध 7 विकेट राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एमसीसी, ठाणे संघाने 25 षटकांत 9 बाद 141 धावा केल्या. त्यात विराट निकुंभचे (70) सर्वाधिक योगदान राहिले. अद्वैत केकणसह (20/3) क्रिस्टियानो बुथेलोने (33/2) छाप पाडली.

वजन कमी कर, तरच फलंदाजीचे वजन वाढेल

पदार्पणातच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरबरोबर पृथ्वी शॉची तुलना केली जायची, पण आता त्याची कारकीर्द धोक्यात आली आहे. मुंबई रणजी संघातून वगळल्यानंतर पृथ्वीला आयपीएल लिलावात किंमत मिळाली नाही. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा त्याला आपल्या क्रिकेटचे वजन वाढवायचे असेल तर आधी पृथ्वीने आपल्या वाढलेल्या शरीराचे वजन 10 किलोपर्यंत कमी करावे, असा सल्ला माजी कसोटीपटू जतीन परांजपेने दिलाय. वजन वाढल्याने पृथ्वीला रणजी संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर 75 लाखांची मूळ किंमत ठेवूनदेखील पृथ्वी गेल्या महिन्यात सौदी अरेबिया येथे झालेल्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला.

ड्युमिनीने सोडले प्रशिक्षकपद

दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षकपद सांभाळत असलेल्या जेपी ड्युमिनीने वैयक्तिक कारणांमुळे ते पद सोडले आहे. खुद्द क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेच (सीएसए) त्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या वर्षीच त्याने मार्चमध्ये या पदाची जबाबदारी घेतली होती. एकमेकांची सहमती घेतल्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याची माहिती सीएसएने दिली. आता लवकरच त्याचे रिक्त स्थान भरले जाईल अशीही माहिती सीएसएने दिली. ड्युमिनी आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 46 कसोटी, 199 वन डे आणि 20 टी-20 सामने खेळला आहे.

श्रीलंकेचे चोख प्रत्युत्तर

रायन रिकल्टनच्या (101) शतकापाठोपाठ कायल वेरेनने (105) केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्व बाद 358 अशी दमदार मजल मारली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने पथुम निसांकाच्या 89 धावांमुळे दक्षिण आफ्रिकेला 3 बाद 242 असे चोख प्रत्युत्तर दिले. निसांकाने दिनेश चंडिमलसह (44) 109 धावांची भागी रचली, तर अँजेलो मॅथ्यूजबरोबर 49 धावांची भर घातली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मॅथ्यूज 40, मेंडिस 30 धावांवर खेळत होते.

दिवसभरात 15 विकेट

हॅरी ब्रुकचे आठवे कसोटी शतक आणि त्याने ऑली पोपसोबत पाचव्या विकेटसाठी केलेल्या 174 धावांची भागीने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सावरले. ब्रुक आणि पोप बाद होताच इंग्लंडचा डाव 280 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या डावालाही एकामागोमाग हल्ले देत पहिल्या दिवसअखेर 86 धावांतच अर्धा संघ गारद करत कसोटीवर आपली पकड मजबूत केली. त्याआधी ब्रुकच्या 115 चेंडूंतील 5 षटकार आणि 11 चौकारांनिशी ठोकलेल्या 123 धावांच्या खेळीने इंग्लडच्या डावाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. हे ब्रुकचे सलग दुसरे शतक आहे.