ऍडलेडच्या ‘गुलाबी’ कसोटीत दिवस ऑस्ट्रेलियानेच गाजवला आणि रात्रीवरही त्यांनीच आपले वर्चस्व राखले. मिचेल स्टार्कच्या स्पार्क आणि स्मार्ट गोलंदाजीपुढे आघाडीवीर ढेपाळल्यामुळे हिंदुस्थानचा पहिला डाव 180 धावांतच आटोपला आणि पहिल्या दिवसअखेर 1 बाद 86 अशी दमदार मजल मारत दुसऱ्या कसोटीच्या पहिला दिवसावर आपलाच दबदबा ठेवला. खेळ थांबला तेव्हा मार्नस लाबुशेन (20) आणि नॅथन मॅकस्विनी (38) हे दोघे खेळत होते.
टॉसही जिंकला आणि फलंदाजी घेतली
हिंदुस्थानी संघात आज तीन बदल झाले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल संघात परतले. सोबतीला रविचंद्रन अश्विनलाही घेऊन आले. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अश्विनच्या अनुभवाला रोहित शर्माने संधी दिली. मात्र चारही वेगवान गोलंदाजांना पुन्हा मैदानात उतरवले. तसेच रोहितने अपेक्षेप्रमाणे राहुलच्याच हाती बॅट दिली आणि स्वतः मधल्या फळीत उतरला. पण आज रोहितची एकही गोष्ट पथ्यावर पडली नाही. ऑस्ट्रेलियाने फक्त एकच बदल केला. जॉश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलॅण्डला संधी दिली.
पर्थची ऍडलेडवरही पुनरावृत्ती
पर्थ कसोटीतही यशस्वी जैसवाल हा मिचेल स्टार्कच्याच गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला होता आणि आज ऍडलेडवर त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. फरक इतकाच होता की, स्टार्कने पहिल्याच चेंडूवर यशस्वीला पायचीत करत सनसनाटी निर्माण केली. यशस्वीच्या रूपाने हिंदुस्थानी डावाला पहिला हादरा बसल्यानंतर के. एल. राहुल आणि शुबमन गिलने संघाला सावरले. दोघांनी 69 धावांची भागी रचत यशस्वीचा धक्का पचवला.
स्टार्कचा हादरा
राहुल आणि शुबमनचा हिंदुस्थानी डावाला बळकटी देण्याचा खेळ सुरू होता. कमिन्स ही जोडी फोडण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होता. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर मिळालेल्या यशानंतर तब्बल 18 षटके ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवता आले नव्हते. तेव्हा कर्णधार कमिन्सने पुन्हा स्टार्कच्या हातात चेंडू दिला आणि स्टार्कने आपल्या दुसऱ्या हप्त्यात केलेला स्पार्क वणवा पेटवणारा ठरला. त्याने चौथ्याच चेंडूवर राहुलला बाद केले. मग तो थांबला नाही. पुढच्याच षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने विराट कोहलीला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडत हिंदुस्थानी डावाला भगदाड पाडले. त्याचे हेच दोन चेंडू निर्णायक ठरले.
रोहितकडून निराशाच
रोहित शर्मा संघात परतला, पण तो सोबत अपयश घेऊनच परतला. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध सलामीला उतरताना धावा काढायला विसरलेल्या रोहितने ऑस्ट्रेलियात मधल्या फळीत येऊनही तेच केले. आघाडीचे फलंदाज कोसळल्यामुळे रोहितला खेळपट्टीवर पाय रोवून उभे रहाण्याची गरज होती, पण त्याने पुन्हा एकदा निराशच केले. संघात पुनरागमन करणाऱ्या स्कॉट बोलॅण्डने त्याला पायचित पकडले. उपाहारानंतर अवघ्या तीन धावांवर रोहितला बाद करत बोलॅण्डने जबरदस्त यश मिळवले. रोहितने गेल्या पाच कसोटींतील (6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11) अपयशी खेळाचे सातत्य ऍडलेड ओव्हलवरही कायम राखले. उपाहारापूर्वी बोलॅण्डने गिलची विकेट काढून आपल्या पुनरागमनातील पहिले यश संपादले होते.
रेड्डीची पुन्हा धमाल
हिंदुस्थानचा अर्धा संघ शंभरीतच आपटला होता. खेळपट्टीवर ऋषभ पंत उभा होता. नितीश रेड्डी त्याच्यासोबत होता. पण पंतच्या फटक्यांना कमिन्सने आज बहरू दिले नाही. फलकावर 109 धावा लागल्या होत्या आणि पंतही बाद झाला. हिंदुस्थानी डावाचा शेवट सुरू झाला होता. पण रेड्डी हिंदुस्थानी संघाला सावरण्यासाठी ‘रेडी’ असल्यासारखा तुफान खेळला. अश्विनने 22 धावांची आक्रमक खेळी केली, पण रेड्डीने बोलॅण्डला ठोकले. त्याच्या एका षटकात दोन षटकार आणि चौकार ठोकत 21 धावा वसूल केल्या. त्याचा 3 चौकार आणि 3 षटकारांचा झंझावात 42 धावांपर्यंत पोहोचला होता. पण स्टार्कनेच त्याला थांबवले आणि हिंदुस्थानच्या पहिल्या डावावरही पूर्णविराम लावला. स्टार्कने 48 धावांत 6 विकेट टिपत कारकीर्दीत 15 व्यांदा पाच विकेट मिळवण्याची करामत केली.
ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात
पर्थप्रमाणे ऍडलेडवरही हिंदुस्थानचा डाव लवकर गारद झाला. त्यामुळे जसप्रीत बुमरा आणि कंपनीकडूनही त्याच कामगिरीची अपेक्षा होती. पण आज ऑस्ट्रेलियाने ती चूक केली नाही. त्यांनी आधीपासूनच सावध खेळ केला. त्यांच्या धावा वाढत नव्हत्या, पण उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी मैदानात होते. हिंदुस्थानला यश मिळत नव्हते म्हणून रोहितने बुमराच्या हातून चेंडू काढून घेतला नाही आणि अखेर बुमराच्या सहाव्या षटकांत ख्वाजा बाद झाला. 24 धावेवर ऑस्ट्रेलियाची विकेट पडली. पण त्यानंतर मॅकस्विनी आणि लाबुशेन यांनी बचावात्मक खेळ करत 22 षटके फलंदाजी केली. रोहितने आपली सर्व अस्त्रं बाहेर काढली, पण एकालाही यश मिळवता आले नाही. दिवसअखेर 1 बाद 86 अशी सुस्थिती असल्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात दमदार मजल मारली.
संक्षिप्त धावफलक ः हिंदुस्थान (प. डाव) – 44.1 षटकांत सर्वबाद 180 (राहुल 37, गिल 31, पंत 21, रेड्डी 42, अश्विन 22; स्टार्क 48/6, कमिन्स 41/2, स्कॉट बोलॅण्ड 54/2).
ऑस्ट्रेलिया (प. डाव) – 33 षटकांत 1 बाद 86 (मॅकस्विनी खेळत आहे 38, लाबुशेन खेळत आहे 20; बुमरा 13/1).