ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू विराटचा घात करतोय

ऑफ स्टंपबाहेरील चेंडू ही विराट कोहलीची कमकुवत बाजू आहे आणि ती बाजू भक्कम करण्यासाठी त्याने आधी जोरदार प्रयत्न केले पाहिजे, असे मत हिंदुस्थानचा माजी कसोटीपटू आणि समालोचक संजय मांजरेकर याने व्यक्त केलेय. या कमकुवत दुव्यामुळेच विराटची सरासरी 50 वरून 48 धावांवर घसरल्याचे खरे कारण मांजरेकरने शोधून काढलेय. हिंदुस्थान सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. पहिल्या कसोटीत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या ‘गुलाबी’ कसोटीला शुक्रवारपासून सुरुवात झालीय. पहिल्या कसोटीप्रमाणे या कसोटीतही विराटच्या बॅटमधून धावा निघतील अशी क्रिकेटप्रेमींना अपेक्षा होती, मात्र विराट अवघ्या 7 धावांवर बाद झाल्याने त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. दरम्यान, संजय मांजरेकरांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली. ‘अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ऑफ स्टंपबाहेरील कमकुवतपणावर मात केली पाहिजे, मात्र त्यासाठी तो विशेष प्रयत्न करत नसल्याने त्याची फलंदाजीची सरासरी 50 वरून 48.13 वर घसरली आहे.