मंगेश मोरे,मुंबई
महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेचा गवगवा करून महिला मतदारांचा कौल मिळवला. मात्र प्रत्यक्षात ‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेबाबत महायुती सरकारचा कागदोपत्री दिखावाच असल्याचे उघडकीस आले आहे. संकटकाळात महिलांच्या मदतीला धावण्यासाठी काही वर्षांपूर्वी ‘निर्भया’ व ‘दामिनी’ पथके स्थापन केली. यातील 18 पथकांचे मोबाईल नंबर महिला व बाल गुन्हे प्रतिबंधक विभागाने सार्वजनिकरीत्या जाहीर केले. त्या 18 पैकी 10 पथकांचे मोबाईल नंबर ‘बंद’ आहेत. त्यामुळे संकटकाळात पथकांची मदत मिळवण्यासाठी संपर्क कसा साधायचा, असा प्रश्न महिलांपुढे उभा ठाकला आहे.
राज्यात तीन वर्षांत एक लाख मुली व महिला बेपत्ता झाल्या. त्यांचा शोध घेण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या याचिकेवरील उत्तरात सरकारने राज्यभरातील ‘निर्भया’ व ‘दामिनी’ पथकांची माहिती सादर केली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कार्यान्वित केलेल्या ‘निर्भया’ व ‘दामिनी’ पथकांचा हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सऍप व मोबाईल क्रमांकांचा तपशील सरकारने दिला आहे. त्या यादीतील 18 पैकी 10 पथकांच्या मोबाईल नंबरवर कॉल करणाऱ्या महिलांना सध्या ‘नंबर बंद आहे’, ‘नंबर अस्तित्वात नाही’, ‘नंबर स्विच ऑफ आहे’, ‘अवैध नंबर’ अशी उत्तरे ऐकायला मिळत आहे. राज्यात बलात्कार, विनयभंग आदी गंभीर गुह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने वेळोवेळी चिंता व्यक्त करून महिला सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही राज्य सरकारला महिलांच्या सुरक्षेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
बेपत्ता मुली, महिलांची संख्या
केंद्रीय गृह मंत्रालयाने 2019 ते 2021 या अवधीत महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या मुली व महिलांची आकडेवारी अलीकडेच संसदेत जाहीर केली. त्यानुसार तीन वर्षांत महाराष्ट्रातून एक लाखांहून अधिक मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. यातील मोठ्या प्रमाणावर मुली, महिलांना अनैतिक कामांमध्ये लोटल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील माजी सैनिक शहाजी जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, वर्दळीच्या व निर्जन ठिकाणी, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी परिसरात महिलांची छेडछाड तसेच अन्य कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी 2014 ते 2021 या कालावधीत ‘निर्भया’ व ‘दामिनी’ पथकांची स्थापना करण्यात आली. सध्या या पथकांचे बंद असलेले मोबाईल नंबर कार्यान्वित करण्याची तसदी सरकार घेत नसल्याने महिला नाराजी व्यक्त करीत आहेत.
या पथकांचे नंबर बंद
वाशीम – अवैध नंबर
धाराशीव – सेवा खंडित
परभणी – स्विच ऑफ
हिंगोली – स्विच ऑफ
सांगली – नंबर बंद
भंडारा – नंबर अस्तित्वात नाही
गोंदिया – अवैध नंबर
अहिल्या नगर – नंबर बंद
जळगाव – एक नंबर बंद
नाशिक शहर- अवैध नंबर