
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ऑनड्युटी दारूच्या नशेत आढळले. त्यांच्यावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अरुण मच्छिंद्रनाथ जाधव (वय ४७) असे डॉक्टरचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. संबंधित डॉक्टरला मद्यधुंद अवस्थेत पकडल्याची ही तिसरी घटना असून, रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दारूड्या डॉक्टरवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपोडे बुद्रूक ग्रामीण रुग्णालयात काल (बुधवार) रात्री सात वाजता जावेद आत्तार (रा. पिंपोडे बुद्रुक) हे नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील नर्सला डॉक्टर कोठे आहे, त्यांना भेटायचे आहे, अशी विचारणा केली. त्यावर नर्सने ड्युटीवर असणारे डॉ. अरुण जाधव हे प्रसूतिगृहात आराम करीत असल्याचे सांगितले. रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि आत्तार डॉक्टरकडे गेले असता, डॉक्टर दारूच्या नशेत जमिनीवर पडलेले आढळून आले. त्याच्या अंगावरील कपडे आणि रूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. आत्तार यांनी लगेच वाठार पोलिसांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि डॉ. जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉ. अरुण जाधववर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
गेल्या वर्षीही डॉ. जाधव मद्यधुंद अवस्थेत पेशंट तपासत होते. त्यावेळी रुग्णांनी गावातील तरुणांना बोलावून घडलेला प्रसंग निदर्शनास आणून दिला होता. पिंपोडे बुद्रूक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना समक्ष भेटून तक्रार केली होती. तसेच कालच्या घटनेची माहिती कळवली आहे. मात्र, कारवाई न करता पुन्हा या डॉक्टरला कामावर हजर केले, हे दुर्दैवी आहे.
– रणजित लेंभे, उपसरपंच, पिंपोडे बुद्रूक ग्रामपंचायत