शिदेंशिवाय शपथविधी पार पाडण्याची तयारी भाजपनं केलेली! संजय राऊत यांचा गौप्यस्फोट, सांगितली इनसाईड स्टोरी

विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळूनही सरकार बनवायला 15 दिवस लागले. काल शपथविधी झाला, त्यातही फक्त तिघांनी शपथ घेतली. अजूनही महाराष्ट्राला पूर्ण सरकार मिळालेले नाही. याचाच अर्थ सर्वकाही आलबेल नाही. एवढेच नाही तर भाजपने शिदेंशिवाय शपथविधी पार पाडण्याची तयारीही केली होती, असा गोप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना केला.

नागपूरच्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करू, असे सांगण्यात येत आहे. मात्र हा विस्तारही पूर्ण नसेल. भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी प्रथेप्रमाणे तो विस्तारही अर्धवट केला जाईल. बहुमताचे सरकार असूनही धुसफूस किंवा अस्थिरता आहे. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस यांनी अनेक योजना जाहीर केल्या. नव्या भूमिका, व्हिजन मांडले. पण त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतील का? कारण काल व्यासपीठावर त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे प्रसन्न नव्हते. उद्धव ठाकरे झाले तेव्हाही या लोकांचे चेहरे पडलेले होते आणि त्यांची प्रकृती बरी नसताना त्यांनी घोटाळा केला. या घोटाळ्याचा परिणाम महाराष्ट्राने पाहिला, असेही राऊत म्हणाले.

नगरविकास आणि गृहमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिंदेंनी अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना शपथ घ्यावीच लागली. कारण त्यांच्याशिवाय शपथविधी पार पाडण्याची तयारी भाजपने केलेली होती. सरकारमध्ये आणि राजकीय वर्तुळात आमचेही हितचिंतक आहेत. शिंदे गटातही आहेत. शिदेंचा दाबदबाव, अडेलतट्टूपणा असाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा आदेश भाजपच्या वरिष्ठांनी दिला होता, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; आधी आदळआपट… रुसवेफुगवे… नको नको म्हणत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

हे सगळ्यांनाच जमते असे नाही!

ते पुढे म्हणाले की, पक्षाचा आदेश आल्याने देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारची पदं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेते मंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते. शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी मंत्री म्हणून काम केलेले आहे. मध्य प्रदेश किंवा अन्य राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. पण एखाद्या माणसाच्या तोंडाला वर्षा बंगल्याचे, सत्तेचे रक्त लागले तर त्यांना ती शिकार सोडावीशी वाटत नाही. उद्धव ठाकरे यांना असे वाटले की मी बहुमत गमावलेले आहे, पदाला चिटकून राहणे योग्य नाही. तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडला. पद मिळाले, काम केले, पद गेले, सत्ता सोडली आणि निघून गेले. हे सगळ्यांनाच जमते असे नाही, ज्यांना जमले त्यांनी केले, ज्यांना जमले नाही ते आदळआपट करत राहिले, असा टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला.

व्यासपीठावरील वावर हा मांडलिक राजे किंवा आश्रीतांसारखा

शपथविधी कार्यक्रमावरही भाजपचीच छाप होती. कारण व्यासपीठावर भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि स्वत: पंतप्रधान, संरक्षणमंत्री होते. भाजपचे स्वत:चे 132 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचा व्यासपीठावरील वावर हा मांडलिक राजे किंवा आश्रीतांसारखा होता. प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली काम करता तेव्हा तुमच्यावर ही वेळ येते. शिवसेनेसारखे पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते हे विरळ असता, असेही राऊत यावेळी म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या 5 माजी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही केला होता. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या, असेही राऊत यांनी सांगितले.

सुडाचे राजकारण भाजपने सुरू केले

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सुडाचे राजकारण भाजपने सुरू केले. ईडी, सीबीआय, पोलीस यांचा वापर आम्ही कधीच केला नाही. विरोधकांशी आम्ही प्रेमाने वागलो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला असून विरोधकांशी कसे वागावे हे आम्हाला माहिती आहे. पण सुडाच्या राजकारणाची, यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरण करण्याची, विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची, त्यांना तुरुंगात सडवण्याची परंपरा केंद्रात आणि राज्यात भाजपने सुरू केली. त्याच्या दबावापोटी अनेक पक्ष फुटले, फोडण्यात आले, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.