
दक्षिणेकडील राज्यात पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला फटका बसला, तर राज्यात यंदा लांबलेला परतीचा पाऊस आणि त्यानंतरचा अवकाळी पाऊस यामुळे शेवग्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. पुण्यासह राज्यातील विविध बाजारपेठांत मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक खूपच कमी होत आहे. किरकोळ बाजारात शेवगा प्रतिकिलो 500 ते 600 रुपये असून दहा ते पंधरा दिवस हे दर कायम राहण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. दर आवाक्याबाहेर गेल्याने शेवगा खरेदीकडे गृहिणींनी पाठ फिरविल्याचे चित्र बाजारात आहे.
राज्यासह परराज्यातून शेवग्याची आवक होते. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत गुजरातमधील शेंगांचा हंगाम, महाराष्ट्र नोव्हेंबर ते जून तर, तामिळनाडू मे ते नोव्हेंबर असा असतो. मात्र, हवामान बदलामुळे शेवग्याच्या लागवडीत घट झाली आहे. सध्या गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. गुजरातसह सोलापूर जिल्ह्यातून शेवग्याची तुरळक आवक बाजारात होत आहे. इतर वेळी बाजारात राज्य, तसेच परराज्यातून रोज चार ते पाच टन शेवग्याची आवक होत असते. सध्या मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दररोज बाजारात 1100 ते 1200 किलो शेवग्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलोस साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळत आहे.
शेवग्याची सर्वाधिक लागवड तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. गुजरात तसेच पुणे विभागातून शेवग्याची बाजारात आवक होते. सांबर, आमटी तसेच भाजीसाठी शेवग्याचा वापर केला जातो. इतर वेळी 100 ते 20 असा शेवग्याचा दर असतो. दक्षिणेकडील राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. परतीच्या पावसाचा फटका शेवग्याला बसला. लागवड कमी झाल्याने सध्या बाजारात शेवग्याची आवक कमी होत आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात शेवग्याची पंधरा दिवसांपासून आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात शेवगा प्रतिकिलो 500 ते 600 रुपयांवर पोहोचला आहे.