‘फायर नही, वाईल्ड फायर’ म्हणत साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा-2’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. पुष्पाची चाहत्यांमध्ये इतकी क्रेझ आहे की, भल्या पहाटेचे शोदेखील हाऊसफुल्ल झाले, मात्र हीच क्रेझ हैदराबाद येथील एका 35 वर्षीय महिलेच्या जिवावर बेतली आहे.
हैदराबाद येथील आरटीसी चौकातल्या संध्या थिएटरमध्ये बुधवारी सायंकाळी चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. क्रिनिंगदरम्यान आलेल्या अल्लू अर्जुन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या गर्दीत तिचा नऊ वर्षांचा मुलगादेखील गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. धक्काबुक्कीमुळे अनेक जण एकमेकांवर पडले. काही लोक जखमीही झाले. या घटनेचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचे चाहते बेशुद्ध अवस्थेत दिसले. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या परिस्थिती हाताळण्यासाठी तोकडी होती. दरम्यान, वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तसेच सौम्य लाठीचार्जसुद्धा करावा लागला. प्रचंड गर्दीमुळे थिएटरचा गेटदेखील ढासळला.
काही तासांत ऑनलाइन लीक
रिलीजच्या काही तासांतच ‘पुष्पा 2’ लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘पुष्पा-2’ रिलीज झाल्यानंतर टोरेंट प्लॅटफॉर्म आणि पायरसी वेबसाइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होऊन निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई
‘पुष्पा 2’ या चित्रपटाने ऍडव्हास बुकिंगमध्येच शंभर कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन किती होणार याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ‘पुष्पा-2’ ने बॉक्स ऑफिसवर 32 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिवसभरात या आकड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.