हिंदुस्थानच्या बजेट एअरलाइन इंडिगोला या वर्षातील जगातील सर्वात वाईट एअरलाइन्सपैकी एक असे सांगण्यात आले आहे. मात्र इंडिगोने बुधवारी हा अहवाल फेटाळला आहे एअरलाईन्स स्कोअर रिपोर्ट 2024 ने जगभरातल्या एअरलाइन्सचे विश्लेषण केले आहे. त्याने एअरलाइन्सची रॅंकिंग केली आहे.
एअरहेल्प स्कोअर अहवाल 2024 मध्ये इंडिगोला 109 पैकी 103 वा क्रमांक मिळाला आहे. एअर इंडिया 61 तर एअरएशिया 94 स्थानावर आहे. या क्रमवारीला फेटाळत इंडिगोने सांगितले की, हिंदुस्थानची विमान वाहतूक नियामक DGCA (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) मासिक आधारावर एअरलाइन्सच्या वेळेवर कामगिरी आणि ग्राहकांच्या तक्रारींचा डेटा प्रकाशित करते. वेळेच्याबाबतीत इंडिगो कायम अग्रेसर राहिले आहे. त्याचा आकार आणि ऑपरेशन्सचे प्रमाण पाहता, इंडिगोकडे इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत कमी ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
इंडिगोकडून सांगण्यात आले की, युरोपिय संघ एजन्सी एअरहेल्पच्या सर्वेक्षणात नोंदवलेले आकडे हिंदुस्थानातील नमुन्याच्या आकाराचा अहवाल देत नाहीत. हे जागतिक विमान वाहतूक उद्योगाद्वारे वापरल्या जाणाऱ्या पद्धती किंवा मार्गदर्शक तत्त्वे देखील विचारात घेत नाहीत. त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण होते. इंडिगो ही हिंदुस्थानातील सर्वाधिक पसंतीची एअरलाइन आहे. आमच्या ग्राहकांना वेळेवर, परवडणारा आणि त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देत आहोत.
DGCA डेटानुसार, इंडिगोने जानेवारी ते सप्टेंबर 2024 पर्यंत 7.25 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा दिली. हिंदुस्थानच्या एव्हिएशन मार्केटमध्ये त्याचा 61.3 टक्के वाटा आहे. टाटा समूहाची एअर इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. याने 1.64 प्रवाशांना सेवा दिली आहे. त्याचा 13.9 टक्के बाजार हिस्सा आहे.