
ईव्हीएमविरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी शेवटच्या तासात 76 लाख मते कशी वाढली, असा प्रश्न समस्त मतदारांसह तज्ज्ञांनादेखील पडला आहे. या प्रक्रियेत नक्कीच काहीतरी हेराफेरी झाली असून ‘ईव्हीएम हटाव.. बॅलेट लाओ; लोकशाही बचाव’ असा नारा ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिला. यापुढील निवडणुका ईव्हीएमवर नव्हे तर बॅलेटवरच घ्याव्यात, अशी मागणी करणारी तब्बल दहा हजार पत्रे राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवली आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षितपणे एकतर्फी लागला. 13 टक्के मतदान शेवटच्या एक तासात कसे वाढले असा प्रश्न विचारण्यात येत आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सर्वत्र होत असून निवडणूक आयोगाच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले. तर सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीवासीयांनी बॅलेट पेपरचाच आग्रह धरला. तर आज ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन केले. ईव्हीएम हटवून बॅलेटवरच निवडणुका घ्या व संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणी करणारी दहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठवली.
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रांवर स्वाक्षरी केली. या मोहिमेत अनेक नागरिकांनीदेखील भाग घेतला. त्यानंतर ही हजारो पत्रे घेऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी ठाण्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये गेले व टपाल पेटीमध्ये ही सारी पत्रे टाकली. यावेळी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात संतप्त घोषणा देण्यात आल्या. ईव्हीएम हटाव.. बॅलेट लाओचा एकच नारा घुमला. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः ही पत्रे टपाल पेटीत टाकली.